बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या (PA) 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाचे अखेर पोलिस तपासातून निरसन झाले आहे. या प्रकरणात कोणताही घातपात अथवा अन्य व्यक्तीचा सहभाग नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, मुलीने स्वतःचे जीवन संपवल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, आई रागावल्याने नाराज झालेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचे तपासातून समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी आई रागावल्याने नाराज झालेली ही अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेली होती. रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध सुरू केला. मात्र, बराच वेळ शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा लागला नसल्याने अखेर कुटुंबीयांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
पोलिसांकडून तिचा शोध सुरू असतानाच शहरातील एका इमारतीत तिचा मृतदेह आढळून आला. अल्पवयीन मुलीचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आणि घटनेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर आमदार रोहित पवार यांनीही पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष तपास करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिसांनी मृत्यूच्या सर्व शक्यता तपासण्यास सुरुवात केली.
तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या फुटेजमध्ये संबंधित मुलगी इमारतीच्या जिन्यातून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर ती इमारतीच्या सहाव्या मजल्यावर गेली आणि तेथून उडी घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्ट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्राथमिक अहवालातूनही मुलीने स्वतःचे जीवन संपवल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तपासात तिच्या मृत्यूमागे अन्य कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आढळून आलेला नाही.
या खुलाशामुळे मुलीच्या मृत्यूभोवती निर्माण झालेल्या संशयाला पूर्णविराम मिळाला असला, तरी अवघ्या 14 वर्षांच्या मुलीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयाने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. सध्या प्रकरणाची पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिसांकडून नियमानुसार सुरू आहे.
रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा अखेरचा प्रवास… घरातून निघाल्यानंतर नेमकं काय घडलं? CCTVने उलगडलं धक्कादायक सत्य!
Leave a Comment






