धावत्या एसटीवर वीजवाहिनी कोसळली; महिला वाहकाला विजेचा शॉक, चालकाने काठीने जीव वाचवला, अन्यथा….

Gramin Varta
367 Views

संगमेश्वर : फणसवणे-उमरे फाट्यावर धावत्या एसटी बसवर विद्युतभारित वाहिनी कोसळल्याने बुधवारी सकाळी अक्षरशः काळजाचा ठोका चुकवणारा प्रकार घडला. वाहिनी बसवर पडताच झालेल्या मोठ्या आवाजाने चालक रवींद्र साप्ते यांनी बस थांबवून बाहेर पाहिले असता वीजवाहिनी तुटून बसवर पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. दरवाजा उघडून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात असलेल्या मानसकोंड येथील महिला वाहक प्राजक्ता शिगवण यांना याच वेळी विद्युतभारित वाहिनीचा जोरदार धक्का बसला. प्रसंगावधान राखत चालकाने काठीच्या सहाय्याने त्यांना विद्युतवाहिनीपासून दूर केल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती.

संगमेश्वर बसस्थानकातून सकाळी सातच्या सुमारास चालक रवींद्र साप्ते हे एमएच २० बीएल २१४८ क्रमांकाची उमरे एसटी बस घेऊन निघाले होते. बस फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असता अचानक मोठा आवाज झाला. काहीतरी गंभीर घडल्याचे लक्षात येताच चालकाने बस थांबवली. बाहेर पाहिल्यानंतर विद्युतवाहिनी तुटून थेट बसवर कोसळल्याचे दिसून आले.

या धक्कादायक प्रसंगात बसमधून बाहेर पडण्यासाठी वाहक प्राजक्ता शिगवण यांनी दरवाजा उघडला. मात्र विद्युतभारित वाहिनीच्या संपर्कात येताच त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याने त्यांना थेट हाताने बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यावेळी चप्पलच्या सहाय्याने विद्युतवाहिनीपासून त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो निष्फळ ठरला.

परिस्थितीची गंभीरता ओळखून चालकाने काठी आणली आणि तिच्या सहाय्याने वाहक शिगवण यांना विद्युतवाहिनीपासून दूर केले. या प्रयत्नामुळे त्यांचा जीव वाचला. विजेच्या धक्क्यामुळे त्यांना दुखापत झाली असून, या घटनेने बसमधील प्रवाशांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी असल्याची माहिती आहे. प्रवाशांची संख्या मोठी असती आणि विद्युतवाहिनीचा संपर्क बसच्या इतर भागांशी झाला असता तर परिस्थिती किती भयावह झाली असती, याची कल्पनाही करवत नाही.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी महावितरणला कळविले. त्यानंतर संबंधित कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि विद्युतवाहिनी हटवून मार्ग सुरक्षित करण्याची कार्यवाही करण्यात आली.

मात्र या घटनेमुळे महावितरणच्या विद्युत यंत्रणेच्या देखभालीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावरून दररोज एसटी बस, खासगी वाहने आणि नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असताना जीर्ण विद्युत खांब, सपोर्ट आणि वाहिन्यांकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याची किंमत निष्पाप नागरिकांना मोजावी लागण्याची शक्यता आहे. फणसवणे येथे घडलेला प्रकार हा केवळ अपघात नसून मोठ्या दुर्घटनेचा इशारा मानला जात आहे.

महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका निष्पाप लोकांना बसण्यापूर्वी रस्त्यालगतच्या सर्व विद्युत खांबांची, सपोर्टची आणि वाहिन्यांची तातडीने तपासणी करावी, धोकादायक यंत्रणा बदलावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी संतप्त मागणी नागरिकांतून होत आहे.

Total Visitors :
4761749
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *