चिपळूणच्या मातीतील गणेशमूर्ती अमेरिकेत विराजमान

Gramin Varta
76 Views

चिपळूण : कोकणच्या मातीत रुजलेली गणेशमूर्ती घडविण्याची कला आता सातासमुद्रापार पोहोचली आहे. चिपळूण तालुक्यातील खांदाट पाली येथे मूर्तिकार राजेश नरळकर यांनी साकारलेली शाडू मातीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती यंदा थेट अमेरिकेतील न्यू जर्सी येथे विराजमान होणार आहे. त्यामुळे चिपळूणच्या पारंपरिक मूर्तीकलेचा सुगंध परदेशातही दरवळणार आहे.

खांदाट पाली येथील नरळकर कुटुंबीय अनेक पिढ्यांपासून गणेशमूर्ती घडविण्याची परंपरा जपत आहेत. याच कलेचा वारसा पुढे नेत राजेश नरळकर यांनी शाडू मातीच्या मूर्तीनिर्मितीला आपली ओळख बनवली आहे. यंदा त्यांच्या कलेला थेट अमेरिकेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली आहे.

खांदाट पाली येथील माहेर असलेले आणि सध्या न्यू जर्सी येथे वास्तव्यास असलेले आंब्रे-सुर्वे कुटुंबीय यंदा अमेरिकेत कोकणच्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला पर्याय म्हणून चिपळूणमध्ये तयार झालेली शाडू मातीची गणेशमूर्ती घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी राजेश नरळकर यांच्याशी संपर्क साधून मूर्तीची मागणी केली.

मूर्ती तयार करण्यासाठी वेळ अत्यंत कमी असतानाही नरळकर यांनी हे आव्हान स्वीकारले. परदेशात मूर्ती पाठविताना आवश्यक असलेले पॅकिंग आणि वाहतुकीचे नियोजन लक्षात घेऊन त्यांनी अल्पावधीत मूर्ती पूर्ण केली. बारकाईने केलेले कोरीवकाम, सुबक आकार आणि प्रसन्न रंगसंगती यामुळे मूर्तीला आकर्षक रूप प्राप्त झाले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा आग्रह धरत राजेश नरळकर आजही शाडू मातीच्या मूर्तींनाच प्राधान्य देतात. पर्यावरणाची हानी टाळतानाच भक्तांच्या श्रद्धेला अनुरूप सात्त्विक आणि रेखीव मूर्ती साकारण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे चिपळूण परिसरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी असते.

गणेशमूर्तीकलेसोबतच लाकूड कोरीवकाम आणि रांगोळी कलेतही नरळकर यांचा हातखंडा आहे. त्यांच्या या कलाप्रवासात आईसह कुटुंबीयांचेही मोलाचे सहकार्य लाभत आहे.

खांदाट पालीसारख्या छोट्याशा गावात साकारलेली गणेशमूर्ती आता थेट अमेरिकेत भक्तिभावाने पूजली जाणार आहे. चिपळूणच्या पारंपरिक कलेसाठी ही बाब निश्चितच अभिमानाची असून, राजेश नरळकर यांच्या कलाकौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Total Visitors :
4762185
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *