पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

Gramin Varta
397 Views

निवळी घाटात रात्रीच्या सुमारास 3 कंटेनरचा अपघात, एक मेसेज आणि बगाटेनी यंत्रणा लावली कामाला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर निवळी येथील उतारावर बुधवारी (२६ ऑगस्ट) रात्री तीन कंटेनरच्या अपघातामुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या तत्परतेमुळे वेळीच नियंत्रणात आली. मध्यरात्रीच्या काळोखात महामार्गाच्या मधोमध बंद पडलेल्या कंटेनरमुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पोलिस यंत्रणेने तातडीने हालचाल करत मार्ग मोकळा केल्याने पुढील अनर्थ टळला. अन्यथा रात्रीच्या सुमारास अनेक गाड्या एकमेकांवर आदळून मोठा अपघात झाला असता.

बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने तीन कंटेनर जात होते. निवळी येथील उतारावर एका कारने एका कंटेनरला धडक दिली. त्यानंतर कार चालक मुंबईच्या दिशेने निघून गेला. या धडकेनंतर कंटेनर एकमेकांवर आदळले. हे तिन्ही कंटेनर एकाच कंपनीचे असल्याची माहिती आहे.

अपघातानंतर यातील एक कंटेनर महामार्गाच्या मधोमध बंद पडला. रात्रीचा काळोख, महामार्गावरून वेगाने धावणारी वाहने आणि रस्त्याच्या मधोमध उभा असलेला कंटेनर यामुळे परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली होती. मागून येणाऱ्या वाहनचालकांना हा कंटेनर वेळीच न दिसल्यास आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

या धोकादायक परिस्थितीची माहिती रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांना मेसेजद्वारे देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता महामार्ग विभागातील पोलिसांना तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. बगाटे यांच्या आदेशानंतर रात्रीच पोलिस यंत्रणा कामाला लागली आणि अपघातग्रस्त तिन्ही कंटेनर बाजूला करून महामार्गावरील वाहतूक मार्ग मोकळा करण्यात आला. पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून दाखविलेली ही तत्परता कौतुकास्पद आहे. संभाव्य मोठा अपघात होण्यापूर्वीच यंत्रणेला सक्रिय करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांच्या त्वरित निर्णयामुळे अनेक वाहनचालकांचा जीव धोक्यात येण्यापासून वाचला.

रत्नागिरी जिल्ह्याला अशा प्रकारे घटनास्थळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेणारे पोलिस नेतृत्व लाभल्याने नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावरील धोकादायक परिस्थितीची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दाखविलेली ही तत्परता नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने निश्चितच आदर्शवत ठरली आहे. नितीन बगाटे यांचे कार्य कौतुकास्पद आहे. बगाटे यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत त्यांना देशातील १०० उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये स्थान मिळाले आहे. कर्तव्य बजावताना तत्पर निर्णयक्षमता, प्रभावी नेतृत्व आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या कार्यशैलीचा हा गौरव मानला जात आहे.
त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे रत्नागिरी पोलिस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.

Total Visitors :
4769520
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *