लोटे एमआयडीसीतील एकही उद्योग बाहेर जाणार नाही; उद्योजक संघटनेचा स्पष्ट निर्वाळा

Gramin Varta
44 Views

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यानंतर उद्योजकांची पत्रकार परिषद; गुजरातला उद्योग स्थलांतराच्या चर्चेला पूर्णविराम

खेड : लोटे अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चेला उद्योजक संघटनेने स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला आहे. लोटे एमआयडीसीतील कोणताही प्रकल्प बाहेर जाणार नसून गुजरातला उद्योग स्थलांतरित करण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिला. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या लोटे एमआयडीसी दौऱ्यानंतर उद्योजकांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

लोटे एमआयडीसीचे अध्यक्ष राज आंब्रे आणि रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत उद्योग क्षेत्रातील विविध प्रश्नांवर भाष्य केले. लोटे एमआयडीसीतील एकही उद्योग बाहेर जाणार नाही, तसेच उद्योग गुजरातमध्ये नेण्याबाबत कोणताही डाव किंवा प्रयत्न सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उद्योग स्थलांतराच्या चर्चेला उद्योजकांच्या भूमिकेमुळे पूर्णविराम मिळाला आहे.

उद्योजकांवर कोणाचाही दबाव नसल्याचेही डॉ. पटवर्धन यांनी स्पष्ट केले. आदित्य ठाकरे यांच्यासोबत झालेली चर्चा बंद दाराआड झालेली नव्हती, तर सर्व विषयांवर खुलेपणाने चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग क्षेत्रासमोरील अडचणी आणि स्थानिक प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून देणे हा या चर्चेमागील प्रमुख उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

लोटे एमआयडीसीतील रस्ते, पाणी, वीज तसेच अन्य पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर शासनासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती उद्योजकांनी दिली. उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडून या प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले. एमआयडीसीतील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेत असून उद्योगांच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडविण्यासाठी शासन आणि उद्योजक यांच्यात सातत्याने संवाद सुरू असल्याचे उद्योजक संघटनेने नमूद केले.

आदित्य ठाकरे यांच्या लोटे एमआयडीसी पाहणी दौऱ्यानंतर उद्योग गुजरातला स्थलांतरित होण्याच्या चर्चेला उद्योजकांनी पत्रकार परिषदेतून वस्तुस्थिती स्पष्ट केली. उद्योग टिकवून ठेवण्यासोबतच एमआयडीसीतील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला लोटे उद्योजक संघटनेचे अध्यक्ष राज आंब्रे आणि रत्नागिरी जिल्हा उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन उपस्थित होते.

Total Visitors :
4771229
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *