पालकमंत्र्यांनी हातोडा मारून तपासले काँक्रिट!
रत्नागिरी : शहरातील रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेत रत्नागिरी नगर परिषदेने गणेशोत्सवापूर्वी शहर खड्डेमुक्त करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शुक्रवारी शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर टिकाऊ काँक्रीटच्या विशेष मिश्रणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करून खड्डे भरण्यात आले. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. खड्ड्यांच्या प्रश्नावरून नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. नगर परिषदेच्या सभेतही या प्रश्नावर जोरदार चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.
रस्ते दुरुस्तीच्या कामाचा दर्जा आणि टिकाऊपणा कायम राहावा, यासाठी यावेळी विशेष काँक्रीट मिश्रणाचा वापर करण्यात आला. जिल्हा शासकीय रुग्णालयासमोरील रस्त्यावर प्रायोगिक स्वरूपात करण्यात आलेल्या कामाची राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी खड्डे भरण्यासाठी वापरण्यात आलेल्या मिश्रणाची गुणवत्ता तपासली. विशेष म्हणजे, पालकमंत्री सामंत यांनी हातात हातोडा घेऊन भरलेल्या मिश्रणावर प्रहार करत त्याची मजबुती आणि टिकाऊपणाची प्रत्यक्ष चाचणी घेतली.
प्रायोगिक स्वरूपात करण्यात आलेल्या कामाच्या निष्कर्षानंतर शहरातील इतर भागांमध्येही याच पद्धतीने खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ वाढत असल्याने त्यापूर्वी रस्त्यांची स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान नगर परिषदेसमोर आहे. या पार्श्वभूमीवर विशेष मोहीम वेगाने राबविण्यात येणार असून शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यावर भर दिला जाणार आहे.
गणेशोत्सवापूर्वी शहरातील रस्ते सुस्थितीत आणण्याच्या नगर परिषदेच्या या मोहिमेमुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. खड्डे बुजविण्याच्या कामाचा दर्जा कायम राखून दुरुस्ती करण्यात यावी, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.




