कुणाचा मृतदेह? ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान; अनोळखी मृतदेहांची संख्या चिंताजनक

Gramin Varta
119 Views
Cropped shot of the feet of an unrecognizable male corpse lying on a hospital bed

रत्नागिरी : जिल्ह्यातील रस्ते, नद्या, नाले, शेतवाड्या तसेच विहिरींमध्ये अनोळखी अथवा बेवारस मृतदेह आढळण्याचे प्रकार चिंताजनक ठरत आहेत. बेपत्ता नागरिक, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती, अपघातातील मृत व्यक्ती तसेच विविध कारणांनी मृत्यू झालेल्यांची ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण होते. अनेकदा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडत असल्याने त्यांची ओळख पटविणे अधिक कठीण होते.

बेवारस नागरिक, घर सोडून गेलेले वृद्ध, मानसिक आजाराने त्रस्त व्यक्ती किंवा प्रवासादरम्यान बेपत्ता झालेले नागरिक यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेह अनेक दिवसांनी अथवा महिन्यांनी आढळतो. काही वेळा मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने केवळ सांगाडा किंवा काही अवशेष शिल्लक राहतात. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते.

मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांकडून परिसरातील पोलीस ठाण्यांमध्ये बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या जातात. मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तू, कपडे, कागदपत्रे तसेच शरीरावरील खुणांच्या आधारे ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जातो. काही प्रकरणांत नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी विविध माध्यमांतून माहिती प्रसारित केली जाते. मात्र मृतदेहाची अवस्था खराब असल्यास या सर्व प्रयत्नांनंतरही ओळख पटत नाही.

मृतदेहाची ओळख पटली नाही तर काही दिवस मृतदेह शवागृहात ठेवला जातो. या कालावधीत नातेवाईक किंवा संबंधित व्यक्तीचा शोध लागला नाही, तर प्रशासनाच्या माध्यमातून अंत्यसंस्काराची प्रक्रिया केली जाते. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था किंवा स्वयंसेवकांच्या मदतीने अशा बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.

जिल्ह्यातील निर्जन रस्ते, नदी-नाले, विहिरी आणि शेतवाड्यांमध्ये मृतदेह सापडण्याच्या घटना समोर येत असल्याने या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. मृतदेहाची ओळख पटविणे हे केवळ पोलिसांचे कर्तव्य नसून, बेपत्ता व्यक्तींची माहिती तातडीने पोलिसांना देणे आणि अनोळखी मृतदेह आढळल्यास तत्काळ माहिती देणेही तितकेच महत्त्वाचे ठरते.

Total Visitors :
4771227
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *