बुरूमतळीत जखमी गाय व नवजात वासराला पालिकेच्या मदतीने उपचारासाठी हलविले

Gramin Varta
51 Views

चिपळूण नगरपालिका आरोग्य विभागाची तातडीची धाव; पावणेदोन तासांच्या प्रयत्नांनंतर बचावमोहीम यशस्वी

चिपळूण : बुरूमतळी परिसरात घराच्या दारात जखमी अवस्थेत गाय व्याल्याची माहिती मिळताच चिपळूण नगरपालिका प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत गाय आणि तिच्या नवजात वासराला सुरक्षितपणे उपचारासाठी हलविले. नगरपालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली.

शुक्रवारी सकाळी सव्वासातच्या सुमारास बुरूमतळी येथील ऐश्वर्या चितळे यांनी भ्रमणध्वनीवरून पालिका प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या घराच्या दाराजवळ गाय व्याल्याची माहिती दिली. गाय आणि वासराची प्रकृती लक्षात घेता त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्याची विनंती त्यांनी केली. यानंतर माहिती चिपळूण नगरपालिका आरोग्य विभागाचे प्रमुख वैभव निवाते यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली. निवाते यांनी तत्काळ दखल घेत सकाळी आठच्या सुमारास आरोग्य विभागाची टीम घटनास्थळी रवाना केली.

पालिकेचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम नवजात वासराला सुरक्षितपणे वाहनात ठेवले. मात्र, गाय घाबरल्याने सैरावैरा धावत असल्याने तिला ताब्यात घेऊन वाहनात चढविण्याचे मोठे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर उभे राहिले. यावेळी भाजपा गटनेते शशिकांत मोदी, नगरसेवक निहार कोवळे आणि नगरसेवक संदीप भिसे यांनी पुढाकार घेत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. डॉक्टरांनी घटनास्थळी उपस्थित राहून आवश्यक उपचारांची व्यवस्था केली.

पालिकेचे अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी सलग प्रयत्न केल्यानंतर अखेर घाबरलेल्या गाईला ताब्यात घेण्यात यश आले. त्यानंतर तिलाही सुरक्षितपणे वाहनात चढवून उपचारासाठी हलविण्यात आले. सकाळी सव्वाआठ ते दहा वाजेपर्यंत सुमारे पावणेदोन तास ही मोहीम सुरू होती.

गाय व वासराला उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलविताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ काही प्रमाणात थांबवावी लागली. या वेळी स्थानिक नागरिक, रिक्षाचालक तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी यांनी प्रशासनाला सहकार्य केले. समाजसेविका राधाताई लवेकर, अनिकेत साळवी, नगरसेवक शशिकांत मोदी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि नगरपालिका आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसह दीपक किंजळकर, राजेंद्र नवरत, अमित टेरवकर, अनिल खापरे, भास्कर शेटकर, विश्वनाथ मोहिते, अमोल गमरे, उमेश मोहिते, दयानंद मोहिते, संदीप शेडगे, रमेश पवार, राहुल तांबे, नितेश कांबळे आदींनी बचावकार्यात मोलाचे सहकार्य केले.

नागरिकांकडून मिळालेल्या माहितीची तातडीने दखल घेत पालिका प्रशासनाने केलेली कार्यवाही आणि स्थानिक नागरिकांनी दाखविलेल्या सहकार्यामुळे जखमी गाय व नवजात वासराला वेळेत उपचारासाठी हलविता आले. या घटनेतून मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी प्रशासन आणि नागरिकांनी संवेदनशीलतेने पुढाकार घेतल्याचे चित्र बुरूमतळी येथे पाहायला मिळाले.

Total Visitors :
4776693
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *