गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्ग धोकादायक; सावर्डे पुलावर रस्ता खचला, दोन वाहनांचे टायर फुटले

Gramin Varta
208 Views

सावर्डे/विनायक सावंत: गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील सावर्डे येथील आरती स्वीटसमोरील पुलाने वाहनचालकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. पुलावरील रस्ता खचून मोठी पोकळी निर्माण झाल्याने या ठिकाणी गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला असून, गणेशभक्त आणि चाकरमान्यांच्या सुरक्षित प्रवासाचा प्रश्न ऐन सणाच्या तोंडावर ऐरणीवर आला आहे.

पुलावरील रस्त्याचा मोठा भाग खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हा खचलेला भाग वाहनचालकांच्या लक्षात येत नसल्याने धोका अधिकच वाढत आहे. काल रात्री या ठिकाणी दोन वाहनांचे टायर फुटल्याने मोठा अपघात आणि संभाव्य जीवितहानी थोडक्यात टळली. मात्र, एखाद्या मोठ्या वाहनाचा ताबा सुटल्यास गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या धोकादायक परिस्थितीबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याने संताप व्यक्त होत आहे. एकीकडे गोव्याकडे जाणाऱ्या मार्गावर काँक्रिटचा पूर्ण पॅच टाकून नुकतीच दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. अशा परिस्थितीत पुलावरील रस्ता आणखी खचल्यास एकेरी वाहतुकीचाही मार्ग बंद होऊन मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे.

धोक्याची तीव्रता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने रात्रीच घटनास्थळी बॅरिकेड्स लावून वाहनचालकांना सावध केले आहे. मात्र, बॅरिकेड्स लावून धोका संपणार नाही; रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालकांकडून व्यक्त होत आहे.

मुंबई-गोवा महामार्ग हा कोकणातील प्रमुख दळणवळणाचा मार्ग असून दररोज हजारो वाहने या मार्गावरून धावतात. गणेशोत्सवासाठी मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार आहेत. त्यामुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असताना पुलावरील हा खचलेला रस्ता प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरला आहे.

गणेशभक्त कोकणच्या दिशेने निघण्यापूर्वीच महामार्गाने प्रशासनाला इशारा दिला आहे. आता दुर्घटना घडल्यानंतर जागे होण्याऐवजी त्यापूर्वीच रस्ता दुरुस्त करा, अशी जोरदार मागणी सावर्डे परिसरातील नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.


सदर महामार्ग हा ब्रिटिशकालीन पूलावरच बांधल्याने येथे पाणी साचून वारंवार खड्डे पडून अपघात होत आहेत तरी ब्रिटिशकालीन पुलाची पूर्ण खालून पाहणी करून
मग महामार्ग तयार करावा अन्यथा मोठ्या आंदोलनाला प्रशासनाला तोंड द्यावे लागेल..
देवराज गरगटे( मा. ग्रा.प. सदस्य समाजसेवक )

Total Visitors :
4754737
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *