चिपळूण : आपल्या आईवर अचानकपणे मगरीने केलेल्या हल्ल्याच्या वेळी आपले अतुलनीय शौर्य आणि धाडस दाखवणाऱ्या स्वर्गी भूपेंद्र पवार या धाडसी कन्येला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळायला हवा, त्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यासाठी शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू, असे प्रतिपादन विभागीय वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई यांनी येथे केले.
मगरीच्या हल्ल्यातून आपल्या आईला सोडवणाऱ्या आणि जीवदान देणाऱ्या कुमारी स्वर्णी भूपेंद्र पवार या अवघ्या दहा वर्षाच्या कन्येचे तिच्या धाडसाबद्दल कौतुक करण्यासाठी तिच्या शाळेच्या वतीने अर्थात भगवान परशुराम पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या वतीने आर सी काळे माध्यमिक विद्यालयात रामकृष्ण स्मृती सभागृहात विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन (दिनांक २७ ) करण्यात आले होते. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अभय सहस्रबुद्धे हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी तथा डीवायएसपी प्रकाश बेले, संस्थेचे सरचिटणीस सुनील गमरे, प्राथमिक विभाग शालेय समितीचे चेअरमन सुहास बहुतले, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनायक माळी, पर्यवेक्षक विशाखा माळी, स्वर्णीचे वडील भूपेंद्र पवार तसेच वनविभाग व पोलीस विभागातील इतर कर्मचारी आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. यावेळी वनाधिकारी श्रीमती गिरीजा देसाई व डी वाय एस पी श्री प्रकाश बेले यांच्या हस्ते अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या स्वर्णी पवार हिचा विशेष सत्कार करण्यात आला .
श्रीमती गिरीजा देसाई यांनी आपल्या भाषणात स्वर्णी पवार हिच्या धाडसाचे कौतुक करून तिच्यावरील असलेल्या संस्कारांचाही गौरव केला. शाळेतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल शिक्षण संस्थेचे कौतुक केले . तसेच ही मुलगी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी निश्चितपणे पात्र आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करूया, त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी डीवायएसपी प्रकाश बेले यांनी आपल्या भाषणात स्वर्णी पवार हिच्या धाडसाबद्दल तिचा गौरव करून आजच्या काळात घरातील झुरळ, पाली यांना घाबरणारी मुले, माणसे असताना त्याच वेळी स्वर्णी पवार सारखी दहा वर्षाची मुलगी मगरीला भिडते ही गोष्ट खरोखरच गौरवास्पद आहे. तिच्याकडून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे, तिने दाखवलेले धाडस, क्षणाचाही विलंब न लावता घेतलेला निर्णय आणि त्यामुळे तिच्या आईचे वाचलेले प्राण या बाबी तिला निश्चितपणे शौर्य पुरस्कार मिळवून देण्यासाठी पुरेशा आहे. निश्चितपणे तिला तो मिळायला हवा, आपल्या शाळेने, संस्थेने योग्य प्रकारे त्याचा प्रस्ताव करावा. त्याला लागेल ते सहकार्य आम्ही पोलीस विभागाच्या वतीने ही करू आणि हा बहुमान आपल्या जिल्ह्याला मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे अभ्यास केला पाहिजे ? याबाबत स्वतःचे उदाहरण देऊन सखोल असे मार्गदर्शन केले. शाळेतल्या विविध उपक्रमांचा त्यांनी गौरव केला.
यावेळी स्वर्णी पवार हिच्या सोबतच शाळेला गांधी रिसर्च फाउंडेशन च्या वतीने गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेत विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल समन्वयक सौ विशाखा माळी, तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळवणाऱ्या कुमारी आर्या जोशी, कुमार दर्शन पाटील यांचा आणि तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवणाऱ्या नाट्य कलावंत विद्यार्थ्यांचा व त्यांचा मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती उज्वला दवंडे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक विनायक माळी यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद केली. तसेच वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल आणि शाळेतून दिल्या जाणाऱ्या अभिनव शिक्षणाबद्दल माहिती दिली. अध्यक्ष भाषणात डॉ. अभय सहस्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून स्वर्णी पवार हिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवण्यासाठी शाळा आणि संस्था पुढाकार घेऊन काम करेल, त्याला आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी प्रारंभी दोन्ही प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संदेश पवार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





