लांजा/फरहान पाटणकर : पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर सेवेत असणारे आणि मूळ लांजा तालुक्यातील तथा लांजा शहरातील रहिवासी संजय रामचंद्र मारळकर यांची नुकतीच पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली आहे.
संजय मारळकर हे लांजा शहरातील बौद्धवाडी येथील रहिवासी असून मारळकर राज्य पोलीस विभागात गेली ३३ वर्षे कार्यरत आहेत. आतापर्यंत रत्नागिरी, दापोली, खेड, देवरुख येथे त्यांनी सेवा बजावली असून आता सध्या लांजा पोलीस ठाण्यात ते कार्यरत आहेत. मारळकर हे १९९४ साली पोलीस विभागात रुजू झाले.
त्यांनी देवरूख येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर काम केले होते, तर आता लांजा पोलीस ठाणे येथे सेवा बजावत असताना गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती झाली. विशेषतः त्यांच्या ३३ वर्षांच्या पोलीस विभागाच्या कारकिर्दीतील विविध गुन्ह्यांत त्यांनी केलेल्या तपासात काही गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा झाली आहे.
दरम्यान, लांजा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे व पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले यांनी संजय मारळकर यांची पदोन्नती झाल्याने त्यांना स्टार लावले व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी महिला हेड कॉन्स्टेबल उर्मिला शेडे आणि कॉन्स्टेबल जान्हवी मांजरे उपस्थित होत्या. तर या पदोन्नतीमुळे मारळकर यांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.






