देशातील संपूर्ण चिप निर्मिती साखळीला मिळणार चालना; केंद्र सरकारकडून १.२७ लाख कोटींची ‘सेमीकॉन २.०’ योजना अधिसूचित

Gramin Varta
9 Views

नवी दिल्ली : देशातील सेमीकंडक्टर उद्योगाला मोठी चालना देण्यासाठी केंद्र सरकारने तब्बल १.२७ लाख कोटी रुपये खर्चाची ‘सेमीकॉन २.०’ योजना अधिसूचित केली आहे. देशात चिप निर्मितीची संपूर्ण यंत्रणा उभारण्यासह डिझाइनपासून उत्पादन, पॅकेजिंग, टेस्टिंग, कच्चा माल, यंत्रसामग्री आणि संशोधनापर्यंतची संपूर्ण सप्लाय चेन विकसित करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै २०२६ मध्ये या महत्त्वाकांक्षी योजनेला मंजुरी दिली होती.

इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मंत्रालयाने सोमवारी ‘सेमिकॉन २.०’ संदर्भातील अधिकृत गॅझेट अधिसूचना जारी केली. या योजनेच्या माध्यमातून भारतातील सेमीकंडक्टर डिझाइन आणि मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टमला सातत्यपूर्ण धोरणात्मक आणि आर्थिक पाठबळ देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. चिप डिझाइन, उत्पादनासाठी आवश्यक कॅपिटल इक्विपमेंट, सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग, चिप असेंब्ली, पॅकेजिंग आणि टेस्टिंग यांसारख्या क्षेत्रांना या योजनेत प्रोत्साहन दिले जाणार आहे.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टममधील ‘सेमीकॉन २.०’च्या सहा स्तंभांबाबत बोलताना जागतिक सेमीकंडक्टर उद्योगातील भागधारकांमध्ये येणाऱ्या दशकांमध्ये मोठ्या गुंतवणुकीसाठी भारत हे योग्य ठिकाण असल्याचा ठाम विश्वास निर्माण झाल्याचे सांगितले. ‘सेमीकॉन १.०’ अंतर्गत मंजूर झालेल्या प्रकल्पांची संख्या तसेच मंजुरीपासून प्रत्यक्ष काम सुरू होण्यापर्यंत आणि त्यानंतर व्यावसायिक उत्पादन सुरू होण्यापर्यंतची गती यामुळे भारताबाबतचा विश्वास वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

काही प्रकल्पांमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर वेगाने काम पूर्ण करण्यात आले असून, एका प्रकरणात ग्राउंडब्रेकिंगनंतर अवघ्या १३ महिन्यांत व्यावसायिक उत्पादन सुरू झाल्याचे वैष्णव यांनी नमूद केले. अनेक प्रकरणांमध्ये सुरुवातीच्या २०० किंवा १५० दिवसांच्या आत सर्व मंजुरी देण्यात आल्या, तर एका प्रकरणात केवळ ९० दिवसांत मंजुरी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या वेगामुळे जागतिक उद्योगविश्वात भारताविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

‘सेमीकॉन २.०’ अंतर्गत सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण व्हॅल्यू चेनला आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चिप डिझाइन, मॅन्युफॅक्चरिंग आणि पॅकेजिंगसह सेमीकंडक्टर इकोसिस्टमच्या विविध विभागांचा यामध्ये समावेश आहे. कम्प्युट, मेमरी, आरएफ, पॉवर, नेटवर्किंग आणि सेन्सर यांसारख्या विविध क्षेत्रांसाठी आवश्यक बेसिक टेक्नॉलॉजी कॉम्पोनंट्स आणि स्टँडर्ड आयपी विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे.

राष्ट्रीय धोरणात्मक आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित करण्यासोबतच मजबूत, विश्वासार्ह आणि स्वदेशी सेमीकंडक्टर तंत्रज्ञान उभारणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. कॅपिटल एक्स्पेंडिचर सपोर्ट जागतिक स्तरावर स्पर्धात्मक ठेवण्याबरोबरच भारतातील टॅलेंट, पॉलिसी निश्चितता आणि इझ ऑफ डुइंग बिझनेस यामुळे देशाला जागतिक सेमीकंडक्टर उद्योगाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनवण्याच्या दिशेने ‘सेमीकॉन २.०’ महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

Total Visitors :
4786580
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *