एक लाख ३१ हजार मतदारांची नावे वगळली; रत्नागिरी जिल्ह्यात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Gramin Varta
99 Views

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदार यादी सोमवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पुनरीक्षण प्रक्रियेत जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३१ हजार ५९६ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याची जबाबदारी आता मतदारांवर आली आहे.

प्रारूप मतदार यादीत नाव वगळले असल्यास संबंधित मतदारांना ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. त्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक धरून ही प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील मतदारांनी मतदार यादीत आपले नाव आहे किंवा नाही, तसेच नाव, पत्ता आणि अन्य तपशील योग्य आहेत का, याची खातरजमा करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसील कार्यालये तसेच जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या पदनिर्देशित ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीनेही आपले नाव तपासता येणार आहे.

जिल्ह्यातून एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळण्यात आल्याने त्यामागील कारणांकडे आता लक्ष लागले आहे. मृत मतदार, स्थलांतरित मतदार, दुबार नोंदणी किंवा अन्य कारणांमुळे ही नावे वगळण्यात आली असण्याची शक्यता आहे. मात्र, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यामुळे संबंधित मतदारांना आपले नाव वगळले गेले आहे का, याची खातरजमा करून त्यावर हरकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना क्रमांक ६, नावावर आक्षेप घेण्यासाठी अथवा नाव वगळण्यासाठी नमुना क्रमांक ७, तर मतदार यादीतील नोंदीत दुरुस्ती किंवा पत्ता बदलण्यासाठी नमुना क्रमांक ८ भरता येणार आहे. त्यामुळे मतदारांनी निर्धारित मुदतीत मतदार यादीची तपासणी करून आवश्यक असल्यास दावे किंवा हरकती दाखल कराव्यात, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत राज्यातील मतदान केंद्रांचेही सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. राज्यातील मतदान केंद्रांची पूर्वीची १ लाख २५३ असलेली संख्या आता १ लाख २१६ झाली आहे. यामध्ये ३९४ नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, मतदारसंख्या कमी झाल्याने ४३१ मतदान केंद्रे कमी करण्यात आली आहेत.

Total Visitors :
4786579
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *