रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शाळा दुरुस्ती आणि नवीन बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून १४ कोटी ६६ लाख ३० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील एकूण ३०२ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर यांनी दिली.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, मंजूर निधीचे तालुकानिहाय वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वाधिक निधी रत्नागिरी तालुक्याला मिळाला असून, तालुक्यातील ६३ शाळांच्या दुरुस्तीसाठी ३२० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याखालोखाल चिपळूणमधील २७ शाळांसाठी २०२.३ लाख, संगमेश्वरमधील ४० शाळांसाठी १९५ लाख, दापोलीतील २२ शाळांसाठी १४०.५ लाख, राजापूरमधील ४१ शाळांसाठी १५५ लाख, लांजामधील ३९ शाळांसाठी १४७.४ लाख, गुहागरमधील ३६ शाळांसाठी १३१ लाख, खेडमधील २९ शाळांसाठी १२१ लाख आणि मंडणगडमधील १३ शाळांसाठी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जुन्या झाल्या असून, काही ठिकाणी पावसाळ्यात गळती, संरक्षण भिंतींचा अभाव तसेच शौचालयांच्या दुरवस्थेसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या निधीतून किरकोळ तसेच मोठ्या स्वरूपाच्या दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. काही ठिकाणी नवीन वर्गखोल्यांचे बांधकामही प्रस्तावित आहे.
शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या भौतिक सुविधा मिळणे आवश्यक असल्याने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. निधी मंजूर झाल्याने संबंधित शाळांमधील दुरुस्तीची कामे लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ३०२ प्राथमिक शाळांची दुरुस्ती; जिल्हा वार्षिक योजनेतून १४ कोटी ६६ लाख मंजूर
Leave a Comment





