फरहान पाटणकर/लांजा: मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी पुलाजवळ भरधाव वेगाने जाणारा १२ चाकी टाटा ट्रक पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवार ४ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी लांजा पोलिस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चालकाचे नाव शाम सिंग (वय ५८, रा.सुकरताल, शहारनपूर, राज्य.उत्तर प्रदेश) असे आहे. शाम सिंग हा आपल्या ताब्यातील ट्रक (क्र.एचआर.३८.एक्स.०९९३) घेऊन मुंबईहून गोव्याच्या दिशेने स्लायडींग घेऊन जात होता. तो अंजणारी पुलाजवळ आला असता पुलाच्या अलीकडील रस्ता उताराचा असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण गमावल्याने ट्रक पलटी झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला. तसेच ट्रक मधील क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार (वय ४१, रा.विकसनगर रोड, मरवा, बेहट, सहारनपूर, राज्य.उत्तरप्रदेश) याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापती झाल्या असून ट्रक व ट्रकमधील मालाचेही नुकसान झाले. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी क्लिनर संदीप कृष्णलाल कुमार याने दिलेल्या फिर्यादी वरून चालकाने परिस्थितीकडे दुर्लक्ष करत, भरधाव वेगाने व हयगयीने ट्रक चालवून स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलीस करत आहेत.
ब्रेकिंग : लांजा अंजणारी पुलावर ट्रकचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, क्लिनर जखमी
Leave a Comment





