लांजा: गोविळ येथे बैलांची निर्दयतेने वाहतूक करणाऱ्यावर लांजा पोलिसांची कारवाई, २.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
1105 Views

लांजा : तालुक्यातील गोविळ स्टॉप येथे बोलेरो पिकअपमधून दोन बैलांची दाटीवाटीने, निर्दयतेने आणि विनापरवाना वाहतूक केल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पिकअप वाहनासह दोन बैल असा एकूण २ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी गणेश गणपत लांबोरे (वय २७, रा. वाडगाव रोड, कालभैरवनगर, धुंदरे, ता. लांजा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार, २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास लांजा-गोविळ मार्गावरून बोलेरो पिकअप (एमएच-०८-एपी-१२११) जात असताना गोविळ स्टॉप येथे पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. त्यावेळी वाहनाच्या हौद्याला चारही बाजूंनी निळ्या व काळ्या रंगाची ताडपत्री घट्ट बांधण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे वाहनात हवा खेळती राहण्यास पुरेशी जागा नव्हती.

वाहनामध्ये दोन बैलांना अत्यंत आखूड दोरीने बांधून कोंबण्यात आले होते. जनावरांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक असलेले विभाजन (पार्टीशन), प्रथमोपचार पेटी तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच जनावरांची वैद्यकीय तपासणी करून वाहतुकीसाठी आवश्यक परवानगीही घेण्यात आली नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुरज मौला नाईकवाडे यांनी लांजा पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपी गणेश लांबोरे याच्याविरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा, महाराष्ट्र पोलीस कायदा, प्राणी वाहतूक नियम तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गणेश लांबोरे याच्याविरुद्ध यापूर्वीही लांजा आणि देवरुख पोलीस ठाण्यांमध्ये प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली आहे.

पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल यू. यू. शेडे पुढील तपास करीत आहेत.

Total Visitors :
4750429
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *