रत्नागिरी (संतोष पवार): १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत रुजू झालेल्या मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी शिक्षक दिनी माळनाका येथील मराठा भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. या लक्षवेधी मोर्चाद्वारे हजारो कर्मचाऱ्यांनी शांततेच्या मार्गाने आपल्या प्रलंबित हक्कासाठी आवाज उठवला. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांना सविस्तर निवेदन पाठवून कर्मचाऱ्यांच्या व्यथा शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
राज्यात २००५ पूर्वी नियुक्त सुमारे २६ हजार कर्मचारी नैसर्गिक न्यायानुसार जुन्या पेन्शनसाठी पात्र आहेत. कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी आणि सेवाज्येष्ठता लागू करताना जर नियुक्ती दिनांकाचा विचार केला जातो, तर मग पेन्शनसाठीही तोच निकष ग्राह्य धरण्यात यावा, अशी आग्रही मागणी निवेदनात करण्यात आली. सेवेच्या सुरुवातीला तब्बल ८ ते १० वर्षे विनावेतन काम केलेल्या या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ८ हजार जण आज सेवानिवृत्त झाले आहेत. मात्र, गेल्या १० ते १२ वर्षांपासून त्यांना कसलेही सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याने ते अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहेत. उतारवयात पोटाची खळगी भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांना भाजी विकणे, हॉटेलमध्ये काम करणे अथवा इमारतींवर गवंडी काम करण्याची वेळ आली असून, हे पुरोगामी महाराष्ट्रातील सरकारसाठी अजिबात भूषणावह नाही, अशा शब्दांत कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. सरकारने पेन्शन देण्याची ऐपत दाखवावी, अन्यथा निवृत्त कर्मचाऱ्यांना थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असा संतप्त सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, संभाजीनगर खंडपीठ तसेच कोल्हापूर सर्किट बेंचने या कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट व सकारात्मक आदेश दिलेले असतानाही शासन मात्र त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शासनाला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास २८ सप्टेंबरपासून लाक्षणिक उपोषण आणि २ ऑक्टोबर २०२६ रोजी महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आमरण उपोषण छेडण्याचा निर्वाणीचा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला आहे. या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी राज्य समन्वयक संदेश राऊत, राज्य प्रतिनिधी रामचंद्र केळकर, जिल्हा जुनी पेन्शन संघटना उपाध्यक्ष रुस्तुम मुल्ला, रवींद्र सुर्वे, जिल्हा सचिव संदेश रहाटे, जिल्हा सहसचिव महेंद्र पवार, जिल्हा मुख्याध्यापक संघटना सचिव महेश पाटकर, पदाधिकारी श्रीशैल्य पुजारी, तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, राजापूर तालुका अध्यक्ष पी. एम. पाटील, सुभाष सोकासने व म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. या विराट मूक मोर्चात जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






