गणेशोत्सवात सीएनजी बंदच्या निर्णयाने चिपळूणमध्ये संताप; रिक्षाचालक आक्रमक, आज प्रांताधिकारी कार्यालयावर धडकणार

Gramin Varta
133 Views

चिपळूण: गणेशोत्सवाच्या ऐन हंगामात शहरातील शिवाजीनगर येथील पंपावर रिक्षा व्यावसायिकांना १० सप्टेंबरपासून सीएनजी पुरवठा बंद केला जाणार असल्याच्या चर्चेने रिक्षा चालक-मालकांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. सणासुदीच्या काळात उद्भवणाऱ्या या गंभीर समस्येच्या निषेधार्थ आणि सीएनजी बंदीचा निर्णय तत्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातील सर्व रिक्षा व्यावसायिक आज सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयावर धडक देऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

गणेशोत्सवादरम्यान चिपळूण शहरात प्रवाशांची व नागरिकांची मोठी वर्दळ असते, ज्यामुळे रिक्षा व्यवसायाला मोठी हंगामी मागणी लाभते. मात्र, नेमक्या याच महत्त्वाच्या काळात रिक्षांना सीएनजी देणे बंद करण्यात आल्यास व्यवसायावर गदा येऊन चालक-मालकांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी सायंकाळी संजय जोशी, दिलीप खेतले, प्रशांत गोरीवले, राजू गुडेकर, सचिन चिले, संजय गमरे, गणेश खेडेकर, सुनाद सावर्डेकर, सदानंद गोंधळी, रामदास भोजने, अनिल गायकर, अमित माटे, संजय सफरे, नरेश मोरे, भरत जोधडे आणि प्रभाकर गमरे आदी रिक्षा व्यावसायिकांनी शिवाजीनगर येथील सीएनजी पंपावर धाव घेऊन व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला; मात्र व्यवस्थापक उपस्थित नसल्याने संवाद होऊ शकला नाही.

जोपर्यंत रिक्षा व्यावसायिकांना सीएनजी सुरळीतपणे उपलब्ध करून दिला जात नाही, तोपर्यंत गणेशोत्सवाच्या संपूर्ण काळात रिक्षा सेवा पूर्णपणे बंद ठेवण्याचा इशारा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. ऐन सणात रिक्षा सेवा ठप्प झाल्यास त्याचा थेट आणि मोठा फटका सर्वसामान्य चाकरमानी व प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तसेच संबंधित सीएनजी पंप व्यवस्थापनाने या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून सामोपचाराने मार्ग काढावा, अशी ठाम मागणी रिक्षा चालक-मालक वर्गातून लावून धरण्यात आली आहे.

Total Visitors :
4820391
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *