मनसेच्या दहीहंडीचा रत्नागिरीत जल्लोष; देवरूखच्या जय बजरंग बली गोविंदा पथकाने ७ थर रचत फोडली हंडी

Gramin Varta
302 Views

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘मनसे दहीहंडी उत्सव २०२६’ रत्नागिरीत मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. नेत्रदीपक रोषणाई, आकर्षक नृत्याविष्कार, उत्कृष्ट नियोजन आणि रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे यंदाचा मनसेचा दहीहंडी उत्सव विशेष लक्षवेधी ठरला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष रुपेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्यासाठी विविध गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत थरारक प्रात्यक्षिके सादर केली. अखेर देवरूख येथील जय बजरंग बली गोविंदा पथकाने सात थरांची रचना करत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. राजापूर येथील धूत पापेश्वर गोविंदा पथकाने दमदार कामगिरी करत उपविजेतेपद मिळवले.

यंदाच्या उत्सवाचे आणखी एक विशेष आकर्षण ठरले ते भगवतीनगर-निवेंडी, गणपतीपुळे येथील एकमेव महिला गोविंदा पथक. या महिला गोविंदा पथकाने महिलांसाठी विशेष आकर्षण ठरलेली ‘मानाची हंडी’ फोडत आपल्या कौशल्याची आणि आत्मविश्वासाची छाप उमटवली. त्यांच्या या कामगिरीला उपस्थित रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त दाद दिली.

दहीहंडीच्या थरारासोबतच नेत्रदीपक रोषणाई आणि विविध नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. गोविंदा पथकांच्या उत्साहाला उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आणि जयघोषात प्रतिसाद दिला. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

या उत्सवाच्या यशस्वी आयोजनामागे मनसेच्या पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिकांची मेहनत महत्त्वाची ठरली. रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर आणि तालुक्यातील पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिकांनी नियोजनापासून प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या अंमलबजावणीपर्यंत विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे यंदाचा मनसेचा दहीहंडी उत्सव रत्नागिरीतील दहीहंडी सोहळ्यांमध्ये आगळावेगळा आणि नेत्रदीपक ठरला.

गोविंदा पथकांचा थरार, महिला गोविंदांचा उत्स्फूर्त सहभाग, आकर्षक रोषणाई, नृत्याविष्कार आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद यामुळे ‘मनसे दहीहंडी उत्सव २०२६’ रत्नागिरीकरांच्या स्मरणात राहणारा ठरला.

Total Visitors :
4820397
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *