सावर्डे (प्रतिनिधी) : सह्याद्री शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, सावर्डे येथील विद्यार्थी स्वर संदीप घाग याने तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत ३८ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. या शानदार कामगिरीमुळे त्याची राजापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
चिपळूण येथील बांधल हायस्कूलमध्ये सोमवारी पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत स्वरने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याच्या या यशामुळे सावर्डे परिसरात तसेच शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वर यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत आला आहे. २०२५ मध्ये तायक्वांदो असोसिएशनच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत त्याने ओपन चॅलेंज फाईटमध्ये कांस्यपदक, फ्रीस्टाईल पुमसे प्रकारात कांस्यपदक तसेच शालेय तायक्वांदो स्पर्धेत कांस्यपदक मिळवत एकूण तीन पदकांची कमाई केली होती. यावर्षी मात्र त्याने आपल्या मेहनतीच्या बळावर सुवर्णपदक पटकावत यशाची नवी उंची गाठली आहे.
स्वरने ऑक्टोबर २०२४ पासून सावर्डे येथील अमेय क्लासेसमध्ये प्रशिक्षक भरत करार, ऋतूज मते आणि रुद्रसर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे व तायक्वांदोचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. नियमित सराव, कठोर मेहनत, जिद्द, चिकाटी आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर त्याने अल्पावधीतच उल्लेखनीय यश मिळवले आहे.
स्वरच्या या यशाबद्दल त्याचे पालक, शिक्षक, प्रशिक्षक आणि मित्रपरिवाराकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करून सावर्डे गाव, शाळा आणि तालुक्याचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात असून त्याला सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.





