साडवली येथे परवान्याविना दोन बैलांची अवैध वाहतूक; पिकअपसह ३.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
262 Views

संगमेश्वर : कत्तलीच्या उद्देशाने दोन बैलांची परवान्याविना आणि निर्दयीपणे वाहतूक केल्याप्रकरणी देवरूख पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. साडवली पार येथे सोमवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बैलांसह बोलेरो पिकअप असा एकूण सुमारे ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास साडवली पार, ता. संगमेश्वर येथे बोलेरो पिकअप क्रमांक एमएच-१०-झेड-८८६७ मधून दोन बैलांची वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले. संबंधितांकडे प्राणी वाहतुकीचा आवश्यक परवाना नसल्याचे समोर आले. तसेच बैलांना आखूड दोरीने करकचून बांधून त्यांच्या हालचालींना वाव न देता वाहनाच्या हौद्यात दाटीवाटीने भरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. कत्तलीच्या उद्देशाने कासारवाडी ते मलकापूर अशी ही वाहतूक केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी श्रीधन तानाजी बाळेकुंद्री (वय ३०, रा. साडवली साईनगर, ता. संगमेश्वर) यांच्या फिर्यादीवरून देवरूख पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. माणिक शंकर कदम, वसंत चंद्राप्पा कांबळे, विक्रम राजाराम पवार, उदय मांगले आणि राजेंद्र रविकांत मोहिरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे १५ हजार रुपये किमतीचा काळ्या रंगाचा, अंदाजे आठ वर्षे वयाचा गावठी जातीचा बैल आणि सुमारे १५ हजार रुपये किमतीचा तांबड्या रंगाचा, अंदाजे सात वर्षे वयाचा जर्सी जातीचा बैल यांचा समावेश आहे. याशिवाय सुमारे तीन लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप गाडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अशा प्रकारे एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

- Advertisement -

या प्रकरणी महाराष्ट्र प्राणीसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ (अ), ५ (ब), ९, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११ (१) (घ), (ड), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ११९, मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम ६६/१९२ तसेच भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरूख पोलिसांकडून सुरू आहे.

Total Visitors :
4826156
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *