संगमेश्वर : परचुरी-वेल्येवाडी परिसरातील रेल्वे बोगद्यात रेल्वेची धडक लागून उत्तर प्रदेशातील ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. पातीराम काशीराम भिटोरा असे मृत तरुणाचे नाव असून तो झाशी, लुहारी, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १ वाजण्यापूर्वी परचुरी-वेल्येवाडी येथील रेल्वे बोगदा क्रमांक १८२ मध्ये रेल्वे ट्रॅकवर घडली. रेल्वेची धडक लागल्याने पातीराम यांना गंभीर दुखापती झाल्या. तसेच मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती परचुरी गावचे पोलीस पाटील सुधीर सिताराम गुरव यांनी दिली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहाटे ४.४४ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत पातीराम यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर उताण्या अवस्थेत आढळून आला. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत होऊन हात तुटलेल्या अवस्थेत होता. रेल्वेच्या धडकेमुळे झालेल्या लहान-मोठ्या गंभीर दुखापती आणि रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.
या प्रकरणी आकस्मिक मृत्यू क्रमांक ३६/२०२६, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून संगमेश्वर पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृत्यूमागील नेमकी परिस्थिती आणि तरुण रेल्वे ट्रॅकवर कसा आला, याबाबत तपासातून अधिक माहिती समोर येणार आहे.
संगमेश्वर: परचुरी-वेल्येवाडी बोगद्यात रेल्वेची धडक बसून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू
Leave a Comment







