चिपळूणमध्ये कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा; ४.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Gramin Varta
209 Views

चिपळूण : कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निर्दयपणे वाहतूक केल्याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तीन बैलांसह बोलेरो पिकअप असा एकूण ४ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ७ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री सुमारे ९.५५ वाजण्याच्या सुमारास शिरगावहून अलोरेकडे जाणाऱ्या मार्गावर, कुंभार्ली गावाच्या अलीकडे असलेल्या नदीच्या पुलावर घडली. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनाची तपासणी केली असता, बोलेरो पिकअप (एमएच ५० एन ५४७८) मधील मागील बाजूच्या हौद्यात तीन बैल दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधून ठेवलेले आढळून आले.

या बैलांना वेदना व यातना होतील, याची कल्पना असतानाही त्यांची निर्दयपणे वाहतूक करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच ही गुरे कत्तलीसाठी किंवा कत्तलीच्या उद्देशाने विक्री करण्यासाठी विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी अजय सुरेश साळुंखे (वय २७), आकाश प्रकाश साळुंखे (वय २९) आणि किरण सुरेश साळुंखे (वय २५) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही मूळचे बत्तीस शिराळा, जिल्हा सांगली येथील असून सध्या देवरुख येथे वास्तव्यास असल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

जप्त करण्यात आलेल्या तीन बैलांची अंदाजे किंमत अनुक्रमे २५ हजार, २० हजार आणि २० हजार रुपये असून त्यांची एकूण किंमत ६५ हजार रुपये आहे. तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप सुमारे ४ लाख रुपये किमतीची असल्याने जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ६५ हजार रुपये आहे.

या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ए), ११(१)(डी), महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ११९, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ९ तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह मोटार वाहन कायद्यातील कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास अलोरे-शिरगाव पोलीस करीत आहेत.

Total Visitors :
4825610
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *