माता मृत्यू रोखण्यासाठी ‘मिशन मोड’वर काम करा; सिझेरियन कमी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

Gramin Varta
71 Views

गणेशोत्सवात नोंदणीकृत मंडळांच्या ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट मोड’वर

रत्नागिरी : जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण तसेच बालकांमधील कुपोषण पूर्णपणे रोखण्यासाठी आणि अनावश्यक सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागाने ‘मिशन मोड’वर काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री गणेश आरोग्याचा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरे आयोजित करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाशी संबंधित विविध समित्यांच्या मॅरेथॉन बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत जिल्ह्यातील माता व बाल आरोग्य, कुपोषण, प्रसूती, सिझेरियनचे वाढते प्रमाण, पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी तसेच गणेशोत्सव काळातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.

गरोदर मातेची नोंदणी झाल्यापासून तिच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवणे आवश्यक असून, संभाव्य गुंतागुंत आणि जोखीम वेळेत ओळखून योग्य उपचार उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, असे जिल्हाधिकारी जिंदल यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांकडे रुग्ण वर्ग केल्यानंतर होणाऱ्या अनावश्यक सिझेरियन प्रसूतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. बालकांचे योग्य पोषण होण्यासाठी आरोग्य तपासणीसोबतच ‘आभा’ आणि ‘आयुष्मान भारत’ कार्ड वाटपाच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रादेशिक मनोरुग्णालयाला आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीएसआर निधीचा वापर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने नागरिक आणि ग्रामस्थ कोकणात दाखल होत असल्याने आरोग्य यंत्रणेने २४ तास सज्ज राहावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सांगितले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबरोबरच सर्पदंश, श्वानदंश आणि विंचूदंशावरील लस व औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिकाही सुसज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. कुपोषित बालकांचे वजन वाढविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये तंबाखू नियंत्रणाबाबत जनजागृती मोहीम राबवावी, असेही त्यांनी निर्देशित केले.

दरम्यान, एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ३६ विशेष आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून, त्यामध्ये १ हजार ५० सॅम (SAM) आणि मॅम (MAM) श्रेणीतील बालकांवर उपचार करण्यात आले. एप्रिल ते जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यात एकूण ३ हजार ४१९ प्रसूती झाल्या. त्यापैकी १ हजार २९८ प्रसूती सरकारी रुग्णालयांत, तर २ हजार १२१ प्रसूती खासगी रुग्णालयांत झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.

मुलींच्या गर्भलिंग निदानाला आळा घालण्यासाठी पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत जिल्ह्यातील १०८ सोनोग्राफी केंद्रांची नियमित तपासणी सुरू आहे. नियमभंग केल्याप्रकरणी मंडणगड येथील एका मल्टीस्पेशालिटी केंद्रावर ‘डेकॉय’ कारवाई करण्यात आली असून, संबंधित सोनोग्राफी मशीन सील करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याबरोबरच माता-बाल आरोग्य आणि अनावश्यक सिझेरियन प्रसूतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

Total Visitors :
4820621
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *