महसूल विभागातील सर्वाधिक सहा जणांवर कारवाई; पोलीस, आरोग्य आणि पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश
रत्नागिरी : शासकीय कामांसाठी सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक करून लाचेची मागणी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. चालू वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात आठ लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये एका खासगी मध्यस्थासह तब्बल ११ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत महसूल विभागातील सर्वाधिक सहा जणांचा समावेश असून, पोलीस, आरोग्य आणि पाटबंधारे विभागातील अधिकारी-कर्मचारीही एसीबीच्या कारवाईत अडकले आहेत.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनुसार महसूल विभागातील पाच प्रकरणांमध्ये तीन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि एका कोतवालासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली. शासकीय कामे करून देण्यासाठी किंवा कामात अडथळे निर्माण न करण्यासाठी नागरिकांकडून लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात एसीबीने सापळा रचून ही कारवाई केली आहे. त्यामुळे महसूल विभागातील लाचखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलीस प्रशासनातील एका प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह एका खासगी व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. सार्वजनिक पाटबंधारे विभागातील एका प्रकरणात कार्यकारी अभियंता आणि लिपिक, तर आरोग्य विभागातील एका प्रकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे विविध शासकीय विभागांमध्ये लाचखोरीविरोधात एसीबीने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे.
दरम्यान, लाच मागणे आणि लाच देणे हे दोन्ही कायद्याने गुन्हे असल्याने नागरिकांनी लाचखोरीला बळी न पडता अशा प्रकारांची माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणतेही कायदेशीर काम करून देण्यासाठी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी विनाकारण पैशांची मागणी करत असल्यास नागरिकांनी घाबरून न जाता एसीबीशी संपर्क साधावा, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी परिस्थितीनुसार मोबाईल किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून ऑडिओ-व्हिडिओ पुरावा नोंदवून तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकृत तक्रार प्रणालीद्वारे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचेही विभागाने म्हटले आहे.
लाचखोरीची तक्रार करण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक १०६४, व्हॉट्सॲप हेल्पलाईन ७०३८३९१०६४ किंवा दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२८९३ यावर संपर्क साधावा. भ्रष्टाचाराला आळा घालून पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यासाठी नागरिकांनी लाच देण्यास आणि घेण्यास स्पष्ट नकार देत या लढ्यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी केले आहे.
आठ महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यात ११ लाचखोर एसीबीच्या जाळ्यात
Leave a Comment






