वाढत्या मागणीमुळे सप्टेंबरअखेरपूर्वीच श्रेणी बंद होण्याची शक्यता
दिल्ली: अमेरिकेत रोजगाराच्या माध्यमातून ग्रीन कार्ड मिळविण्याची प्रतीक्षा करणाऱ्या भारतीयांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे.वाढत्या मागणीमुळे इबी-1 व्हिसा श्रेणीचा भारतासाठीचा निर्धारित कोटा ३० सप्टेंबर रोजी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वीच पूर्ण होण्याची शक्यता अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे भारतीय अर्जदारांसाठी ही श्रेणी काही काळासाठी उपलब्ध होणार नसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सप्टेंबर महिन्याच्या विसा बुलेटीनमध्ये याबाबत इशारा दिला आहे. भारताशी संबंधित परदेशी नागरिकांकडून ईबी-1 व्हिसासाठी वाढती मागणी आणि मोठ्या प्रमाणावर होणारा व्हिसांचा वापर लक्षात घेता, आर्थिक वर्ष २०२६ संपण्यापूर्वीच भारतासाठीची निर्धारित मर्यादा गाठली जाऊ शकते, असे विभागाने म्हटले आहे.
कोणासाठी महत्त्वाची आहे इबी-1श्रेणी ?
इबी-1 ही अमेरिकेत रोजगाराच्या माध्यमातून ग्रीन कार्ड मिळविण्यासाठीची महत्त्वाची श्रेणी आहे. या श्रेणीत असाधारण कौशल्य असलेल्या व्यक्ती, प्राध्यापक, संशोधक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील वरिष्ठ अधिकारी आणि व्यवस्थापकांचा समावेश होतो.भारतीय नागरिकांकडून या श्रेणीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज होत असल्याने त्यांच्यावर या संभाव्य मर्यादेचा थेट परिणाम होऊ शकतो.
कोटा संपल्यास काय होणार ?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या म्हणण्यानुसार, भारतासाठीचा इबी-1 कोटा ३० सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वीच संपल्यास रोजगाराधारित व्हिसाची ही श्रेणी उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे पात्र भारतीय अर्जदारांना पुढील उपलब्धतेची प्रतीक्षा करावी लागू शकते.विभागाने या परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मागणी आणि उपलब्ध कोट्यानुसार आवश्यक ते बदल केले जातील, असेही विभागाने नमूद केले आहे.
रोजगाराधारित व्हिसांसाठी देशनिहाय मर्यादा
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२६ साठी Immigration and Nationality Act (INA) च्या कलम २०१ अंतर्गत जगभरातील रोजगाराधारित प्राधान्य व्हिसांची मर्यादा १,८६,३१७ इतकी आहे.अमेरिकेच्या नियमानुसार, एका देशाला एकूण वार्षिक रोजगाराधारित व्हिसांच्या ७ टक्क्यांपर्यंत व्हिसा मिळू शकतात. त्यानुसार देशनिहाय कमाल मर्यादा २८,८६२ इतकी ठरते.
भारतीय अर्जदारांकडून रोजगाराधारित ग्रीन कार्डसाठी असलेली मोठी मागणी आणि उपलब्ध मर्यादित कोटा यामुळे इबी-1 श्रेणीवर दबाव वाढला आहे. त्यामुळे अमेरिकेत ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या उच्च-कुशल भारतीय व्यावसायिकांसाठी आगामी काळ महत्त्वाचा ठरणार आहे.
अमेरिकेच्या ग्रीन कार्डसाठी प्रतीक्षा करणाऱ्या भारतीयांना मोठा धक्का; इबी-1 कोटा संपण्याची शक्यता
Leave a Comment





