लांजा (विशेष प्रतिनिधी) : मुलाच्या अचानक उद्भवलेल्या गंभीर आजारपणाचा तीव्र मानसिक धक्का सहन न झाल्याने शेवरवाडी येथील वृद्ध माता विजया भिकाजी यादव (वय ८४) यांचे राहत्या घरी हृदयद्रावक निधन झाले. पोटच्या मुलाची ढासळलेली तब्येत आणि विरहाची असह्य काळजी यामुळे या मातेची प्राणज्योत मालवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मूळ वेरवली येथील रहिवासी असलेल्या विजया यादव या सध्या लांजा शेवरवाडी येथे आपल्या कुटुंबीयांसमवेत वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा अरविंद उर्फ बापू भिकाजी यादव यांची प्रकृती अचानक खालावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने रत्नागिरी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तिथे त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे अवघ्या पाच दिवसांच्या आत त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात हलवावे लागले.
एकीकडे मुंबईतील केईएम रुग्णालयात मुलावर जीवन-मरणाची झुंज सुरू असतानाच, दुसरीकडे घरामध्ये मुलाच्या गंभीर आजाराची चिंता आई विजया यांना पोखरत होती. मुलाच्या तब्येतीचा बसलेला तीव्र मानसिक धक्का आणि विरह सहन न झाल्याने अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. आई आणि मुलाच्या या हृदयद्रावक नियतीमुळे संपूर्ण लांजा शेवरवाडी परिसर तसेच त्यांचे मूळ गाव वेरवली या दोन्ही गावांवर दुःखाची गडद छाया पसरली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, तीन नातवंडे आणि एक पणतू असा मोठा परिवार आहे.






