रत्नागिरीत नामफलकावर छत्रपतींच्या उल्लेखावरून मनसे आक्रमक

Gramin Varta
291 Views

महिनाभरात नामफलक न बदलल्यास मनसेकडून ‘योग्य ते नामकरण’ करण्याचा इशारा

रत्नागिरी : छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण केले जाते; मात्र प्रसिद्धीच्या विषयात त्यांचाच एकेरी उल्लेख केला जात असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रत्नागिरी नगरपरिषदेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी नगर येथे नगरपरिषदेने बांधलेल्या निवारा शेडच्या नामफलकावर छत्रपतींचा एकेरी उल्लेख करण्यात आल्याचा दावा करत हा नामफलक येत्या महिनाभरात बदलावा, अन्यथा मनसेकडून त्याचे ‘योग्य ते नामकरण’ करण्यात येईल, असा इशारा मनसेचे रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष श्री. रुपेश जाधव यांनी दिला आहे.

जाधव यांनी यासंदर्भात रत्नागिरी नगरपरिषद तसेच जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांचे लक्ष वेधले आहे. छत्रपतींच्या नावाचा राजकीय वापर केला जात असताना प्रसिद्धीच्या विषयात मात्र त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख टाळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

“छत्रपतींचे नाव घेऊन महाराष्ट्रात राजकारण करायचे आणि प्रसिद्धीचा विषय आला की सोयीस्करपणे त्याला बगल देऊन छत्रपतींचा असा एकेरी शब्दात उल्लेख करायचा,” असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी संबंधित नामफलक तातडीने बदलण्याची मागणी केली आहे.

येत्या महिनाभरात नामफलकात आवश्यक तो बदल करण्यात आला नाही, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या प्रकरणी पुढील भूमिका घेतली जाईल आणि संबंधित नामफलकाचे ‘योग्य ते नामकरण’ करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

या मागणीमुळे रत्नागिरी नगरपरिषदेच्या नामफलकावरील उल्लेखाचा मुद्दा चर्चेत आला असून, प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4833241
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *