मुंबई-गोवा महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा फोल; अपूर्ण पूल आणि रखडलेल्या बायपासमुळे यंदाही गणेशभक्तांची कोकणवारी खडतर

Gramin Varta
47 Views

मुंबई: लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे चार दिवस उरले असताना, मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदाही प्रचंड तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत. संबंधित शासकीय यंत्रणांकडून महामार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र अनेक महत्त्वाचे उड्डाणपूल आणि बाह्यवळण मार्गांची (बायपास) कामे आजही अपूर्ण अवस्थेत लटकलेली आहेत. पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला २०११ मध्ये, तर इंदापूर ते झाराप या दुसऱ्या टप्प्याला २०१४ मध्ये सुरुवात झाली होती. ही दोन्ही कामे दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित असताना भूसंपादनातील अडसर, पर्यावरणविषयक परवानग्या आणि ठेकेदारांची निष्क्रीयता यामुळे हा प्रकल्प तब्बल दशकभराहून अधिक काळ रखडला. २०२६ चा उत्तरार्ध सुरू झाला तरीही या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास जाऊ शकलेले नाही, हेच विदारक वास्तव समोर आले आहे.

यंदाच्या उत्सवापूर्वी इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळण रस्त्यांची किमान एक मार्गिका सुरू करून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र कोकण रेल्वेने तुळई (गर्डर) टाकण्याच्या कामासाठी आवश्यक असलेला मेगाब्लॉक देण्यास नकार दिल्याने हे काम ऐनवेळी ठप्प झाले. परिणामी, गणेशभक्तांना पुन्हा एकदा इंदापूर आणि माणगाव शहरांमधील तीव्र वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहात अडकावे लागणार आहे. दुसरीकडे, चिपळूण शहरातील उड्डाणपुलाचे काम अद्याप अपूर्ण असून नागोठणे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाला तडे गेल्याचे उघडकीस आल्याने तो पूल सध्या सुरक्षेच्या कारणास्तव पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तेथे तात्पुरती मलमपट्टी करून हलक्या वाहनांसाठी एक मार्गिका सुरू करण्याची धडपड सुरू असली, तरी संरचना व सक्षमता चाचणीचा अहवाल आल्याशिवाय वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने अडचणी अधिक वाढल्या आहेत.

शुक्रवारपासून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा ओघ सुरू होणार असून, एसटी महामंडळाने दीड हजारांहून अधिक जादा बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. खासगी वाहने आणि बसेसच्या प्रचंड लोंढ्यामुळे वाहनांच्या संख्येत विक्रमी वाढ होणार असतानाच नागोठणे, इंदापूर, माणगाव आणि चिपळूण या पट्ट्यातील रखडलेली कामे प्रवाशांसाठी मोठा डोकेदुखी ठरणार आहेत. माणगाव आणि इंदापूर बायपासची किमान एक लेन खुली झाली असती तरी मोठा दिलासा मिळाला असता, मात्र ती न झाल्याने या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून कोंडीचे मोठे संकट ओढवणार असल्याचे वाहनचालक प्रवीण पाटील यांनी उद्वेगाने सांगितले. त्यामुळे यंदाही प्रशासनाचे कागदी दावे फोल ठरून गणेशभक्तांची कोकणची वाट अत्यंत खडतर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Total Visitors :
4837298
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *