रत्नागिरी/ अमित कांबळे: रत्नागिरी शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते तसेच रेल्वे स्टेशन परिसर, खेडशी ते हातखंबा मार्गावर ठिकठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढल्याने प्रवासी वर्गाला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मधोमध गुरे बसत असल्याने वाहनचालकांना वाहने थांबवून त्यांना बाजूला करावे लागत असून, यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे.
विशेषतः गणपतीपुळे तसेच कोकणातील अन्य पर्यटनस्थळांकडे जाण्यासाठी रत्नागिरीत दाखल होणाऱ्या पर्यटकांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी अचानक गुरे आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. काही वेळा प्रवाशांनाच वाहनातून उतरून गुरांना बाजूला हाकलावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
मोकाट गुरांमध्ये काही आक्रमक बैलांचाही समावेश असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांना हाकलताना प्रवासी जखमी होण्याची तसेच गुरे अचानक रस्त्यावर आल्याने वाहनांचा अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषतः वर्दळीच्या मार्गावर ही परिस्थिती कायम राहिल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.
या समस्येबाबत वेळोवेळी तात्पुरती कारवाई केली जाते; मात्र काही दिवसांत परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्याने नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी व पर्यटक रत्नागिरीत दाखल होत असताना शहरातील प्रमुख मार्गांवरील मोकाट गुरांचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत आहे. संबंधित प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता मोकाट गुरांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा प्रवासी व नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
रत्नागिरी शहरासह रेल्वे स्टेशन मार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव; प्रवासी त्रस्त
Leave a Comment






