देवरुख: शेजारी राहणाऱ्या महिलेचा विश्वास संपादन करून, घरगुती कार्यक्रमात घालण्यासाठी उसने घेतलेले सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र परत न करता एका महिलेची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार साडवली येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरुद्ध फसवणूक आणि विश्वासाघात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी दर्शना दिलीप सावंत (वय ५९, मूळ रा. वसई पूर्व, सध्या रा. मार्लेश्वर हेरिटेज रो हाऊस, साडवली, संगमेश्वर) या संतोष शेडगे यांच्या बंगल्यात भाड्याने वास्तव्यास आहेत. त्यांच्याच परिसरात मार्लेश्वर हेरिटेज अपार्टमेंटमध्ये राहणारी आरोपी अंकिता केशव पालव (वय ३२, मूळ रा. बिळवस, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) हिची सावंत यांच्याशी ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपी अंकिता पालव हिने ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सावंत यांच्या घरी जाऊन त्यांचा विश्वास संपादन केला. आपल्या घरी कौटुंबिक कार्यक्रम असल्याचे सांगत तिने सावंत यांच्याकडे अंगावर घालण्यासाठी सोन्याचे मंगळसूत्र उसने मागितले. शेजारील महिलेवर विश्वास ठेवून सावंत यांनी आपले सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे ३ तोळे वजनाचे जुने वापरते सोन्याचे मंगळसूत्र तिच्या स्वाधीन केले.
कार्यक्रम संपल्यानंतर सावंत यांनी आपल्या मंगळसूत्राबाबत अंकिता हिच्याकडे वारंवार विचारणा केली. मात्र, आरोपीने विविध कारणे सांगून दागिना परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सावंत यांनी देवरुख पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आरोपी अंकिता पालव हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१६(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.





