रत्नागिरी: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने आदेशाचा भंग करून शहरात बेकायदेशीररीत्या प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मांडवी ते पेठकिल्ला रस्त्यावर सापळा रचून या तडीपार इसमाला रंगेहात पकडले असून, त्याच्याविरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मदताहिर इब्राहिम मस्तान (वय ३६, रा. वरचा मोहल्ला, मिरकरवाडा, रत्नागिरी) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मदताहिर याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे उपविभागीय दंडाधिकारी, उपविभाग रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये त्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि रायगड या चार जिल्ह्यांच्या सीमांतून दोन वर्षांच्या कालावधीसाठी हद्दपार केले होते. हा तडीपारीचा अधिकृत आदेश आरोपीला १२ जुलै २०२६ रोजी रीतसर बजावण्यात आला होता. या आदेशानुसार त्याला नमूद चार जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास अथवा वास्तव्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली होती.
शासनाच्या या आदेशाची कोणतीही पर्वा न करता आरोपी मोहम्मदताहिर हा बेकायदेशीररीत्या शहरात वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने गुरुवारी, १० सप्टेंबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास मांडवी ते पेठकिल्ला जाणाऱ्या मार्गावरील अलहंम पार्कसमोर गस्त वाढवली. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश राजेंद्र सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम १४१ आणि १४२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.






