रत्नागिरी वार्ताहर : ऐन गणेशोत्सवात रत्नागिरी जिल्ह्याला हादरवणारी घटना आज उघडकीस आली. रत्नागिरी मिरजोळे येथील तरुणीचा तिच्याच प्रियकराने खून करून आंबा घाटात मृतदेह दरीत फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणीचा शोध घेत असताना हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संशयित प्रियकराला ताब्यात घेतले असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
भक्ती जितेंद्र मयेकर (वय २२, रा. मिरजोळे) ही तरुणी दिनांक २१ ऑगस्ट २०२५ पासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दिली होती. तिच्या नापत्ता तक्रारीची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाणे नापत्ता रजिस्टर नंबर ७८/२०२५, दिनांक २१/०८/२०२५ रोजी करण्यात आली होती. अनेक दिवस शोध घेऊनही भक्तीचा ठावठिकाणा लागत नव्हता, तिचा फोनही बंद होता. याच दरम्यान, भक्तीच्या कुटुंबीयांनी तिच्या प्रियकरावर, दुर्वास दर्शन पाटील (रा. वाटद, खंडाळा, जंगमवाडी) याच्यावर संशय व्यक्त केला. भक्तीचे दुर्वासनेच अपहरण केले असावे आणि तिचा घातपात केला असावा, अशी शक्यता त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मांडली.
या गंभीर आरोपांनंतर पोलिसांनी तात्काळ दखल घेत तपास सुरू केला. कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६५/२०२५ क. १३८ BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपी दुर्वास दर्शन पाटील याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी सुरू केली.
तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने केलेल्या तपासणीत दुर्वासने पोलिसांपुढे धक्कादायक गुन्ह्याची कबुली दिली. दुर्वासने दिलेल्या माहितीनुसार, त्याने दिनांक १६/०८/२०२५ रोजी सायंकाळी ७.४५ च्या सुमारास त्याच्या सायली देशी बारमध्ये त्याचे दोन साथीदार यांच्या मदतीने भक्तीचा कट रचून खून केला. खुनानंतर तिचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने आंबा घाट परिसरात फेकून दिल्याची त्याने कबुली दिली. मात्र निर्घृण खून करून ही दुर्वास हा सर्वामध्ये मिळून मिसळून वावरत होता जणू काही घडलेच नाही. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार त्याचे लग्न ही ठरल्याचे समजते. त्यानुसार तो ठरलेल्या मुलीचे तो फोटो स्टेटस वर ठेवत होता. यातून भक्ती आणि दुर्वास यांच्यात खटके उडत होते. आणि यातूनच खून करण्यात आला असावा अशी चर्चा परिसरात आहे.
आरोपीच्या कबुलीनुसार, रत्नागिरी पोलिसांनी तात्काळ आंबा घाटात शोधमोहीम सुरू केली. ट्रेकर्सच्या मदतीने पोलिसांनी दरीतून भक्तीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवणे सुरुवातीला कठीण होते, परंतु तिच्या हातावरील टॅटूवरून तिची ओळख निश्चित झाली. या प्रकरणात दुर्वास दर्शन पाटील आणि त्याचे दोन साथीदार यांचा खुनाचा कट रचण्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण रत्नागिरी शहर आणि विशेषतः मिरजोळे व खंडाळा परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री. विवेक पाटील करत असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
महिन्या भरातील तिसऱ्या खुनाने रत्नागिरी जिल्हा हादरला
जिल्ह्यात महिन्याभरात हा तिसरा खून असून पहिला खून चिपळुणातील निवृत्त शिक्षिकेचा ट्रॅव्हल एजंटने खून केल्याची घटना घडली. त्यानंतर रत्नागिरी नाचणे येथे मुलाने जन्मदात्या आईचा खून केल्याची दुर्दैवी घटना घडली. हे प्रकरण ताजे असताना आता मिरजोळे येथील तरुणीचा प्रेम संबंधातून खून केल्याची घटना घडली आहे. या साऱ्या हादरवणाऱ्या प्रकाराने रत्नागिरी जिल्ह्यात खुनाचे सत्र वाढत चालल्याचे दिसून येत आहे.