दापोलीत निसर्गाची अवकृपा दूर करण्यासाठी मुस्लिम बांधव एकवटले

Gramin Varta
68 Views

नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर पर्जन्यवृष्टीसाठी ‘नमाज-ए-इस्तिस्का’ द्वारे विशेष प्रार्थना

दापोली :  यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत पडला असून संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. या निर्माण झालेल्या तीव्र दुष्काळाचे संकट निवारण्यासाठी आणि निसर्गाची अवकृपा दूर व्हावी या उद्देशाने दापोलीतील तमाम मुस्लिम बांधवांनी एकत्र येत एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. दापोली व संपूर्ण परिसरात तसेच देशामध्ये मुसळधार पाऊस पडावा यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीने नॅशनल हायस्कूल दापोली शाळेच्या मैदानावर सामूहिकरीत्या विशेष नमाज अदा करण्यात आली. शुक्रवार, दिनांक १९ जून २०२६ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघड्या मैदानावर पार पडलेल्या या विशेष प्रार्थनेच्या वेळी उपस्थित सर्वांनीच अल्लाहच्या चरणी मनोभावे लीन होऊन पर्जन्यवृष्टीसाठी साकडे घातले.

इस्लामिक परिभाषेत या विशेष सामूहिक प्रार्थनेला ‘नमाज-ए-इस्तिस्का’ (सलात-अल-इस्तिस्का) असे म्हटले जाते. जेव्हा जेव्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे तीव्र दुष्काळ, कोरडवाहू परिस्थिती किंवा पाण्याची भीषण टंचाई निर्माण होते, तेव्हा मुस्लिम समाजात सर्व मतभेद विसरून सामूहिकरित्या एखाद्या मोठ्या उघड्या मैदानावर एकत्र येत ही नमाज अदा करण्याची अत्यंत जुनी आणि पवित्र परंपरा आहे. याच परंपरेचे पालन करत दापोलीतील मुस्लिम बांधवांनी या कठीण काळात एकत्र येत शेतकरी राजाला दिलासा मिळावा आणि पाण्याचे संकट दूर व्हावे यासाठी नॅशनल हायस्कूलच्या विस्तीर्ण मैदानावर ही नमाज पठण करून निसर्गाला प्रसन्न करण्यासाठी प्रार्थना केली. या विशेष प्रार्थनेची संपूर्ण दापोली परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

Total Visitors :
4820521
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *