वाशिष्ठी नदीत मुंबईतील व्यक्तीचा मृतदेह आढळला

Gramin Varta
509 Views

चिपळूण : शहरातील फरशी तिठा पुलाजवळील वाशिष्ठी नदीत गुरुवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्ती मुंबई येथे वास्तव्यास असलेली असल्याची माहिती समोर आली असून, चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव अमित शहा (वय अंदाजे ४०) असे असून, ते मूळचे गुजरात येथील रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून ते मुंबई येथे वास्तव्यास होते. सुमारे बारा वर्षांपूर्वी त्यांनी चिपळूण तालुक्यातील वैजी येथील एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. ते २१ जून रोजी रेल्वेने चिपळूण येथे आल्याची माहिती मिळाली आहे.

गुरुवारी सकाळी फरशी तिठा पुलाजवळील वाशिष्ठी नदीत एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिकांना दिसून आला. याची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या सहकार्याने मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर ओळख पटवून मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, या घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Total Visitors :
4577000
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *