कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक संथ गतीने, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

Gramin Varta
219 Views

पोलादपूर: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, दुसरीकडे भोगाव हद्दीतील ‘डेंजर झोन’मध्ये अद्याप काम अपूर्ण असल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. पावसाचा जोर वाढल्याने डोंगराळ भागातून दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. हॉटेल अन्नपूर्णा ते चोळई दरम्यान सुमारे दोन किलोमीटर परिसरात रस्ता खचल्याने आणि दरडी कोसळल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. चौपदरीकरणाच्या कामासाठी डोंगर कापल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

भोगाव हद्दीतील ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, तिथे जय भारत कंपनीकडून तात्पुरती व्यवस्था म्हणून खडीकरण करण्यात आले आहे. मात्र, पावसाच्या संततधारेमुळे या कच्च्या रस्त्यावरही मोठमोठे दगड येऊन पडत आहेत. प्रशासनाने दरडी रोखण्यासाठी गॅबियन नेटवर्क उभारले असले तरी, पावसाचा वाढता जोर पाहता ते अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. जर भविष्यात मोठी दरड कोसळली, तर संपूर्ण मुंबई-गोवा महामार्ग ठप्प होण्याची भीती व्यक्त होत आहे. पावसाळा सुरू होऊनही ‘डेंजर झोन’मधील कामे अपूर्ण राहिल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांकडून संताप व्यक्त केला जात असून, प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.

Total Visitors :
4827595
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *