कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार विमा भरपाई; आमदार शेखर निकम यांच्या आक्रमक मांडणीला यश

Gramin Varta
183 Views

रत्नागिरी: कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सध्या नैसर्गिक संकटामुळे हवालदिल झाले असून, त्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लावून धरला. निकम यांच्या या ठोस मांडणीला यश आले असून, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आगामी १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात विमा भरपाई जमा करण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही दिली आहे.

अधिवेशनात आमदार शेखर निकम यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधताना सांगितले की, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ५४ हजार शेतकरी नुकसानग्रस्त आहेत. त्यांना जाहीर झालेली २२,५०० रुपयांची तुटपुंजी मदत अद्याप मिळालेली नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडल्यामुळे ही मदत वाढवून किमान एक लाख रुपये करावी, मध्यम मुदतीच्या कर्जाचे रूपांतर पीक कर्जात करावे आणि आंबा-काजू उत्पादकांना कर्जमाफीचा लाभ मिळावा, अशा मागण्या निकम यांनी केल्या. तसेच, आधुनिक तंत्रज्ञानासाठी विशेष अनुदान देण्याची मागणीही त्यांनी लावून धरली.
यावर उत्तर देताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, कोकणातील शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव सरकारला आहे. मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. राज्यभरात हवामान आधारित पीक विमा योजनेतून २१७ कोटींची मदत मंजूर झाली असून, त्यातील ९० कोटी रुपये केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहेत. ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे.

सभागृहात अधिकृत घोषणा करताना मंत्री भरणे म्हणाले की, अधिवेशन संपण्यापूर्वीच विमा कंपनीशी समन्वय साधून कोकणातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील १५ दिवसांच्या आत विमा भरपाईची रक्कम जमा केली जाईल. आमदार शेखर निकम यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Total Visitors :
4577007
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *