परदेश प्रवास महागणार; १ जुलैपासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ

Gramin Varta
263 Views

नवी दिल्ली : परदेश प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी असून, केंद्र सरकारने १ जुलै २०२६ पासून पासपोर्ट शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पासपोर्ट नियमांमध्ये सुधारणा करत सरकारने नवीन दर अधिसूचित केले आहेत. या नवीन दरवाढीनुसार, आता सर्वसामान्यांना सामान्य आणि तत्काळ अशा दोन्ही श्रेणींसाठी अधिक शुल्क मोजावे लागणार आहे. सामान्य पासपोर्ट अर्जाचे शुल्क १,५०० रुपयांवरून थेट २,५०० रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे, तर तत्काळ पासपोर्टसाठी आता ३,५०० रुपयांऐवजी ५,००० रुपये शुल्क द्यावे लागेल. वारंवार प्रवास करणाऱ्यांसाठी ६० पानांच्या सामान्य पासपोर्टचे शुल्क २,००० रुपयांवरून ३,५०० रुपये, तर तत्काळ श्रेणीतील याच पासपोर्टचे शुल्क ४,००० रुपयांवरून ६,००० रुपये करण्यात आले आहे.

या दरवाढीचा फटका नवीन पासपोर्ट काढणाऱ्यांना आणि पासपोर्ट नूतनीकरण करणाऱ्यांना बसणार आहे. तथापि, सरकारकडून ८ वर्षांपर्यंतची मुले आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन पासपोर्ट अर्जावर १० टक्के शुल्क सवलत कायम ठेवण्यात आली आहे. जुन्या दराने पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्जदारांकडे ३० जूनपर्यंतची मुदत आहे. दरम्यान, नुकतेच परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट हे नागरिकत्व सिद्ध करणारे दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे, विविध सरकारी कागदपत्रांच्या अधिकारांबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. पासपोर्टच्या शुल्कातील ही वाढ प्रशासकीय प्रक्रियेचा भाग असल्याचे सांगितले जात असले तरी, यामुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे.

Total Visitors :
4576811
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *