कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषद राज्यात आदर्श निर्माण करणार; शिक्षण व आरोग्य सुविधांसाठी ३० कोटींचा निधी

Gramin Varta
240 Views

रत्नागिरी: कुपोषणमुक्तीसाठी रत्नागिरी जिल्हा परिषद अत्यंत प्रभावीपणे काम करत असून, आगामी काळात विविध उपाययोजनांच्या माध्यमातून हे प्रमाण शून्यावर आणत राज्यात एक आदर्श निर्माण करण्याचा संकल्प जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेत आयोजित कुपोषित बालकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत राज्यातील कुपोषण कमी असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीत रत्नागिरी दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात तीव्र कमी वजनाची ३४ तर मध्यम कमी वजनाची ६३२ बालके असून, या बालकांना कुपोषणाच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या बालकांना आणि त्यांच्या पालकांना आठ दिवस भोजनाची व्यवस्था करून पोषक आहार दिला जाणार आहे. यामध्ये डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलचे सहकार्य घेतले जाणार असून, औषधे व पूरक आहारासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, संबंधित भागातील जिल्हा परिषद सदस्य आता या बालकांचे ‘पालकत्व’ स्वीकारणार असून, त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.

आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी ग्रामीण भागातील दरवर्षी १० प्राथमिक आरोग्य केंद्रे अद्ययावत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला असून, यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला आहे. जिल्ह्यात २०० ते २५० नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी २० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या शाळांच्या इमारतींची अवस्था बिकट आहे, अशा शाळांचा प्राधान्यक्रमाने आराखडा तयार करून तातडीने दुरुस्तीची कामे सुरू करावीत, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. सामंत यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मोठी मदत होणार आहे.

Total Visitors :
4576952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *