मुंबई-गोवा महामार्गाच्या हरितिकरणासाठी तळकांटे येथे वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ; पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार

Gramin Varta
260 Views

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे निसर्गाचा समतोल बिघडू नये, यासाठी आता महामार्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यावर भर दिला जात आहे. महामार्गावरील तळकांटे सप्तलिंगी ते बावनदी या मार्गावर दुतर्फा वृक्षारोपण करण्याच्या विशेष उपक्रमाचा शुभारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला. विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन यावेळी डॉ. सामंत यांनी केले.

याप्रसंगी बोलताना पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले की, केवळ रस्ते बांधणे हाच एकमेव उद्देश नसून, महामार्गाचे विकासकाम करताना निसर्गाचे सौंदर्य जपून परिसराचा कायापालट करणे आवश्यक आहे. महामार्ग उभारणीच्या कामात ज्या झाडांची हानी झाली आहे, त्याची भरपाई करण्यासाठी ही वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येत आहे. या मार्गाला ‘हरित महामार्ग’ बनवण्याचा शासनाचा निर्धार असून, स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यातून हा परिसर अधिक हिरवागार आणि सुंदर करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या पर्यावरणपूरक उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बंड्याशेठ साळवी, अभिजित हेगशेट्ये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, तळकांटे गावच्या सरपंच सुषमा बने, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि शरद कदम यांच्यासह स्थानिक नागरिक व निसर्गप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेमुळे महामार्गाच्या दुतर्फा परिसराला लवकरच एक नवी हिरवी झळाळी प्राप्त होणार असून, पर्यावरणाच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Total Visitors :
4576810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *