रत्नागिरीतील चर्मालय चौकात अर्धवट कामांमुळे वाहनचालकांचे हाल; खड्डे आणि खडीमुळे अपघातांचा धोका

Gramin Varta
53 Views

रत्नागिरी: मिऱ्या-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्माणाधीन कामाचा फटका रत्नागिरी शहरातील चर्मालय चौकाला बसत असून, सध्या येथील दुरवस्थेमुळे नागरिक आणि वाहनचालक प्रचंड हैराण झाले आहेत. पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित असलेली कामे अद्याप अर्धवट असल्याने पावसाच्या पहिल्या सरींपासूनच या चौकात जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावर साचणारे पाणी आणि जागोजागी असलेले खड्डे यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

चर्मालय चौकात पुरेशी जलनिस्सारण व्यवस्था नसल्याने पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचत आहे. रस्त्यावरील खड्डे पाण्यामुळे झाकले जात असल्याने वाहनचालकांना त्यांचा अंदाज येत नाही, परिणामी येथे दररोज वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. वाहतूक कोंडी सोडवण्याऐवजी केवळ नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा भर असल्याचे पाहून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या गंभीर समस्येसोबतच रस्त्यावर विखुरलेली बारीक खडी दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाच्या ओल्या रस्त्यामुळे ही खडी अधिक निसरडी झाली असून, यामुळे वाहने घसरून अपघातांच्या घटनांत वाढ झाली आहे. रस्ते कामे अर्धवट ठेवून खडी हटवण्याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम करताना नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार होणे आवश्यक असताना, येथील स्थिती मात्र अत्यंत धोकादायक बनली आहे. या परिसरातील रखडलेली रस्ते कामे तातडीने मार्गी लावण्यात यावीत, जलनिस्सारण व्यवस्था सक्षम करावी आणि रस्त्यावरील खडी हटवून चौक सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी या चौकातील कामांचा गांभीर्याने आढावा घेऊन तातडीने सुधारणा करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4577064
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *