आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील एकेरी मार्ग बंद, वाहनचालकांना सतर्कतेचे आवाहन

Gramin Varta
446 Views

साखरपा: रमेश शिंदे / सिकंदर फरास: संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान शुक्रवारी सकाळी सुमारे ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास मोठी दरड कोसळली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून दक्खन ते कळकदारा दरम्यानचा एकेरी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे.

कोसळलेली दरड वाहतूक सुरू असलेल्या मार्गाच्या अत्यंत जवळ येऊन थांबली आहे. सुदैवाने चार पदरी महामार्गाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या लोखंडी संरक्षक कठड्यामुळे मोठे दगड थेट वाहतुकीच्या मार्गावर आले नाहीत. मात्र काही दगडांचे तुकडे रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांसाठी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

आंबा घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वाढत असून, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी विशेष दक्षता बाळगावी, वेगावर नियंत्रण ठेवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरड हटविण्याचे काम सुरू असून परिस्थितीवर संबंधित यंत्रणांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.

Total Visitors :
4827289
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *