अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्येच व्हावे; विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी किशोर नारकर यांची मागणी

Gramin Varta
227 Views

पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच स्थापन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी शैक्षणिक संस्थेचे सदस्य तथा पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर यांनी केली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, पालकांची सोय आणि परिसराचा सर्वांगीण विकास विचारात घेता, हे कार्यालय पाचलसाठी सर्वात सोयीचे ठिकाण ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

पाचल हे राजापूर पूर्व विभागातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र असून, येथे हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, बी.कॉम. महाविद्यालय आणि विविध व्यावसायिक तसेच कौशल्य विकास अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पाचलवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे, पाचल हे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे अधिकृत परीक्षा केंद्र असल्याने दरवर्षी शेकडो विद्यार्थी येथे परीक्षा देण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती आणि विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी वारंवार महसूल कार्यालयात जावे लागते. जर अप्पर तहसील कार्यालय पाचलमध्ये स्थापन झाले, तर विद्यार्थ्यांची ही कामे शिक्षणासोबतच एकाच ठिकाणी सहज पूर्ण होतील. यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे.
पाचलमध्ये स्टेशनरी दुकाने, बँका, पोस्ट कार्यालय, ई-सेवा केंद्रे आणि एसटी बसस्थानकासह वाहतुकीच्या उत्तम सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहेत. अप्पर तहसील कार्यालयाचे मुख्यालय निश्चित करताना केवळ भौगोलिक स्थान न पाहता, त्या ठिकाणची शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेणे गरजेचे आहे.

पाचलने अनेक वर्षांपासून शैक्षणिक केंद्राची धुरा यशस्वीपणे सांभाळली असून, भविष्यातही प्रशासकीय सेवा देण्यास हे गाव पूर्णपणे सक्षम आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा गांभीर्याने विचार करून, शासनाने अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय पाचल येथेच मंजूर करावे, असे आवाहन पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव आणि पाचलचे माजी उपसरपंच किशोर नारकर यांनी प्रशासनाकडे केले आहे.

Total Visitors :
4580880
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *