पायाभूत सुविधा आणि प्रशासकीय अनुभवामुळे अप्पर तहसील कार्यालयासाठी पाचल हाच सक्षम पर्याय: माजी सरपंच अशोक सक्रे

Gramin Varta
202 Views

पाचल/ तुषार पाचलकर: राजापूर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसीलदार कार्यालयाचे मुख्यालय कोठे असावे, याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पाचल हेच सर्वात सोयीचे आणि सक्षम ठिकाण असल्याचे मत माजी सरपंच अशोक सक्रे यांनी व्यक्त केले आहे. पाचलकडे महसूल प्रशासनाचा जुना अनुभव आणि आवश्यक पायाभूत सुविधांची भक्कम साठवणूक असल्याने हे कार्यालय येथेच स्थापन व्हावे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.

पाचल हे अनेक दशकांपासून पंचक्रोशीचे प्रमुख सेवा केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे तलाठी कार्यालय, कृषी मंडळ अधिकारी कार्यालय, महा-ई-सेवा केंद्रे, बँका, एसटी नियंत्रण कक्ष आणि पोलीस नियंत्रण कक्षासह ५२ हून अधिक शासकीय व सार्वजनिक सेवा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वी पाचलमध्ये नायब तहसीलदार कार्यालय कार्यरत होते, त्यामुळे प्रशासकीय कामकाजाची यंत्रणा येथे पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे. सध्याच्या घडीला परिसरातील नागरिक त्यांच्या दैनंदिन कामांसाठी, शिक्षणासाठी आणि आरोग्यविषयक गरजांसाठी पाचलवरच अवलंबून आहेत. जर अप्पर तहसीलदार कार्यालय येथेच झाले, तर नागरिकांचा प्रवास आणि होणारा त्रास वाचणार आहे.

सरकारी कार्यालये ही पुढाऱ्यांच्या सोयीसाठी नसून ती सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी असतात, असे सांगत सक्रे यांनी जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. पाचलची ही मागणी कोणाच्याही विरोधात नसून ती केवळ जनतेच्या सुविधेसाठी आहे. शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी आणि महिला वर्गाची सोय लक्षात घेता, प्रशासनाने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा, असे आवाहन करत त्यांनी नागरिकांना शासनाच्या हरकती नोंदवण्याच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4821032
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *