चिपळूण-संगमेश्वरच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणार; एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची पहिली बैठक संपन्न

Gramin Varta
116 Views

सावर्डे: चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि सर्वसामान्याभिमुख करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या ‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती’ची पहिली महत्त्वपूर्ण बैठक सावर्डे येथील संपर्क कार्यालयात आमदार शेखर निकम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. बैठकीत प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त पदे तातडीने भरणे, सर्पदंश आणि श्वानदंशावरील लसींचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, तसेच देवरुख ग्रामीण रुग्णालय आणि संगमेश्वर ट्रॉमा केअर सेंटरमधील बंद असलेल्या आरोग्य सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार शेखर निकम यांनी यावेळी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्वयाने काम करण्याचे निर्देश देत, मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा वेळेत मिळेल, याची दक्षता घेण्यास सांगितले. बैठकीत आरोग्य संस्थांच्या स्वच्छता, माता-बाल आरोग्य, लसीकरण आणि जनजागृती मोहिमा राबवण्यावरही चर्चा झाली. यादरम्यान उपजिल्हा रुग्णालय कामथे येथे मंजूर झालेल्या ५० खाटांच्या रुग्णालयाबद्दल समितीने आमदार निकम यांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर केला. तसेच सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम रूम आणि पार्किंगची उभारणी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करणे आणि उपकेंद्रांवरील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबतचे पाच महत्त्वाचे ठराव सर्वानुमते संमत करण्यात आले. या बैठकीला मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *