आंबेनळी घाट ३१ जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद; जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Gramin Varta
166 Views

अलिबाग: पोलादपूर-महाबळेश्वर राज्य महामार्गावरील आंबेनळी घाटात दरडी कोसळण्याचा वाढता धोका आणि अतिवृष्टीची परिस्थिती लक्षात घेता, जिल्हादंडाधिकारी किशन जावळे यांनी हा मार्ग ३१ जुलै २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. ७ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. पोलादपूर-आंबेनळी-महाबळेश्वर हा राज्य महामार्ग (SH-१३९) अत्यंत संवेदनशील आणि भूस्खलनप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या मार्गाच्या सुरक्षिततेबाबत कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ आणि पोलादपूर तहसीलदारांनी सादर केलेल्या अहवालानुसार, यापूर्वी ३ जुलै ते ६ जुलै या कालावधीत घाट मार्ग खबरदारीचा उपाय म्हणून बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान, घाट परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने मानवी जीवितहानी टाळण्यासाठी हा मार्ग बंद ठेवणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनीही रस्ता सुरक्षिततेच्या दृष्टीने हा मार्ग बंद ठेवण्याची शिफारस केली होती. या सर्व अहवालांचा गांभीर्याने विचार करून जिल्हा प्रशासनाने जनहितार्थ हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत वाहनचालकांनी आंबेनळी घाटाचा वापर टाळावा आणि प्रवासासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *