कोळंबे हायस्कूलची धोकादायक इमारत अखेर सील; ४०० विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाची तत्परता

Gramin Varta
680 Views

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचा फटका आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला बसला असून, महामार्गालगतच्या डोंगराचा भाग खचल्याने धोकादायक बनलेली कोळंबे येथील कमळजाबाई हायस्कूलची नवीन इमारत अखेर गुरुवारी प्रशासनाकडून सील करण्यात आली आहे. ३५० विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
महामार्गाच्या कामादरम्यान शाळेच्या मागील बाजूस असलेल्या डोंगराचा भाग खचून मोठी दरड कोसळल्याने शाळेची नवीन इमारत आणि शौचालयाचा भाग अत्यंत असुरक्षित झाला होता. वारंवार होणाऱ्या भूस्खलनामुळे ही इमारत कधीही कोसळण्याची भीती निर्माण झाली होती.

या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये यांनी तातडीने सूत्रे हलवत बीडीओ, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, महसूल प्रशासन आणि पोलिस विभागाची संयुक्त बैठक बोलावली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या जिवाचा विचार करून इमारत तातडीने रिकामी करण्याचे आणि धोकादायक ठरलेल्या सहा वर्गखोल्यांमधील विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे कठोर निर्देश देण्यात आले.


गुरुवारी कडेकोट पोलिस बंदोबस्तात ही कारवाई पूर्ण करण्यात आली. या वेळी सभापती शर्वरी वेल्ये यांच्यासह नायब तहसीलदार गिरी, गटशिक्षणाधिकारी विजय परिट, मंडळ अधिकारी अमर चाळके, पंचायत समिती सदस्य सुहास माईंगडे, संस्थाध्यक्ष नयन मुळ्ये आणि संदेश जोशी उपस्थित होते. तसेच पोलिस बीट अंमलदार विजय मनवल व सुनील शिगवण यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी या कारवाईत सहभाग घेतला. प्रशासनाच्या या तातडीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असला, तरी महामार्ग प्राधिकरणाच्या कामामुळे झालेली ही दुरवस्था चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.

Total Visitors :
4576509
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *