देवरुख – रत्नागिरी मार्गावर कारची दुचाकीला जोरदार धडक; तीन तरुण गंभीर जखमी

Gramin Varta
850 Views

देवरुख : देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटात शनिवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास कार आणि दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, तुळसणीच्या दिशेने येणारी दुचाकी आणि देवरुखच्या दिशेने जाणारी कार पाटगाव घाटातील वळणावर समोरासमोर आली. यावेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना रस्त्याच्या बाजूला सुरक्षित ठिकाणी हलवले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या मदतीने तिन्ही जखमींना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.

या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार घाटातील धोकादायक वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असावा.

Total Visitors :
4833747
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *