ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मध्यरात्री सुरक्षा यंत्रणांची मोठी धावपळ

Gramin Varta
421 Views

मुंबई : सुप्रसिद्ध ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची खळबळजनक धमकी मिळाल्याने रविवारी मध्यरात्री सुरक्षा यंत्रणा आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने ताज हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून केला होता. या धमकीमुळे मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि तातडीने सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री १२ वाजून १३ मिनिटांनी नवी मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला होता. माहिती मिळताच मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा, कोलाबा पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) यांनी ताज हॉटेलमध्ये धाव घेतली. हॉटेलची मुख्य लॉबी, पार्किंग, स्विमिंग पूल आणि सर्व संवेदनशील परिसराची कसून तपासणी करण्यात आली. अनेक तासांच्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू न आढळल्याने पोलिसांनी ही धमकी अफवा असल्याचे स्पष्ट केले.

तांत्रिक तपासादरम्यान, हा खोडसाळ फोन नवी मुंबईतील तुर्भे परिसरातून करण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली असून, त्याला ताब्यात घेण्यासाठी तुर्भे पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम तीव्र केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील सुरक्षा यंत्रणा काही काळ तणावाखाली होत्या. अशा प्रकारे अफवा पसरवून शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला असून, आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Total Visitors :
4576119
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *