चिपळूण: रस्ता विचारण्याच्या बहाण्याने मोबाईल पळवणारी गँग पोलिसांच्या जाळ्यात; सांगलीतून तिघे संशयित अटक

Gramin Varta
341 Views

चिपळूण : अलोरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हिसकावून पळून जाणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला असून, या प्रकरणातील तीन आराेपींना सांगली जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पवारवाडी फाटा आणि शिरगाव रहाटवाडी परिसरात चिपळूणचा रस्ता विचारण्याच्या बहाण्याने एकाच पद्धतीने नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून जाण्याच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी अलोरे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांनी तातडीने मार्गदर्शक सूचना देत पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष तपास पथके तयार केली होती.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत सुरू असताना पोलिसांना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणातून महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील मौजे वांगी येथे धडक कारवाई करत विश्वनाथ अमर शिंदे, प्रथमेश मलिक मोरे आणि अक्षय संभाजी जाधव या तीन्ही संशयितांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आला आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी तिन्ही आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल अलोरे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

- Advertisement -

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या सूचनांनुसार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार विजय आंबेकर, दिपराज पाटील, योगेश नार्वेकर आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने पार पाडली.

Total Visitors :
4827295
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *